अवघ्या दोन वर्षांचा मुलगा ओळखतो 195 देशांचे ध्वज | पुढारी

अवघ्या दोन वर्षांचा मुलगा ओळखतो 195 देशांचे ध्वज

अमृतसर : पंजाबमध्ये अमृतसरमधील तन्मय नारंग या अवघ्या 1 वर्ष 8 महिने वयाच्या बालकाने एक विश्वविक्रम केला आहे. इतक्या लहान वयातच हा बालक तब्बल 195 देशांचे ध्वज ओळखू शकतो. यापूर्वी बालाघाटच्या अनुनय गढपाले या बालकाने 1 वर्ष 7 महिने या वयात 40 देशांचे तर तेलंगणामधील तक्षिका हरी या बालिकेने 2 वर्षे पाच महिने या वयात 69 देशांच्या ध्वजांची ओळख केली होती. हा विक्रम 2022 मध्ये झाला होता.

नोयडामधील पाच वर्षांच्या आदेशनेही यापूर्वी 195 देशांचे नाव आणि ध्वज पाहून आपल्या नावाची नोंद लिम्का बुकमध्ये केली होती. आता तन्मयने हा नवा विश्वविक्रम केला आहे. त्याची आई हिना सोई नारंग यांनी सांगितले की तन्मय एक वर्ष 4 महिन्यांचा होता त्यावेळीच त्याच्यासाठी माईंड डेव्हलपमेंट गेम्स आणले होते. त्यामधील फ्लॅग कार्डस् त्याला अतिशय आवडत असत.

आई-वडिलांसमवेत बसलेले असताना तो हे कार्ड हातात धरून त्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असे. आता तन्मय दोन वर्षांचा झाला असून काही दिवसांपूर्वीच त्याला वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डस्चे सर्टिफिकेट, मेडल आणि कॅटलॉग मिळाले आहे. तन्मयला लसीकरणासाठी डॉक्टरांकडे नेले असताना त्यांना ज्यावेळी समजले की तो 165 देशांच्या ध्वजांना त्यांच्या देशाच्या नावासह ओळखू शकतो त्यावेळी त्यांनी त्याची माहिती विविध रेकॉर्ड बुक्सकडे पाठवली होती. सप्टेंबर 2022 मध्ये त्याची वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये एंट्री पाठवली होती.

Back to top button