‘जेम्स वेब’ने शोधला सर्वात छोटा लघुग्रह | पुढारी

‘जेम्स वेब’ने शोधला सर्वात छोटा लघुग्रह

वॉशिंग्टन : ‘नासा’च्या जेम्स वेब अंतराळ दुर्बिणीने लाँच झाल्यापासूनच चमकदार कामगिरी करण्यास सुरुवात केलेली आहे. आता या दुर्बिणीने लघुग्रहांच्या पट्ट्यातील सर्वात छोट्या आकाराचा लघुग्रह शोधला आहे. या लघुग्रहाची लांबी 300 ते 650 फूट इतकी आहे. युरोपियन संशोधकांनी ‘जेम्स वेब’च्या सहाय्याने आतापर्यंत अज्ञात असलेल्या या लघुग्रहाचा छडा लावला आहे. हा लघुग्रह रोममधील कोलोसियम इतक्या आकाराचा आहे.

मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांदरम्यान लहान-मोठ्या अवकाशीय शिळांचा एक पट्टाच आहे. त्याला ‘अ‍ॅस्टेरॉईड बेल्ट’ असे म्हटले जाते. याच पट्ट्यातील हा सर्वात लहान आकाराचा लघुग्रह आहे. ‘नासा’ने म्हटले आहे की दुर्बिणीचा वापर करून आतापर्यंत शोधण्यात आलेल्या लघुग्रहांमध्ये हा सर्वात छोट्या आकाराचा लघुग्रह आहे. त्याचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये यांची तपशीलवार माहिती जाणून घेण्यासाठी अधिक संशोधनाची गरज असल्याचेही ‘नासा’ने म्हटले आहे. दुर्बिणीच्या ‘मिड-इन्फ्रारेड इन्स्ट्रूमेंट’च्या सहाय्याने हा लघुग्रह शोधण्यात आला. जेम्स वेब अंतराळ दुर्बिणीची ‘सेन्सिटीव्हिटी’ प्रचंड आहे. त्यामुळेच हा लघुग्रह शोधण्यात यश आल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. तब्बल 10 कोटी किलोमीटर अंतरावरील अवघ्या शंभर मीटर आकाराच्या अशा लघुग्रहाला शोधणे ही सोपी गोष्ट नाही. ही दुर्बिण गेल्यावर्षीच्या जुलैपासून सक्रिय झालेली आहे. ही आतापर्यंत सर्वात शक्तिशाली अंतराळ दुर्बिण आहे.

Back to top button