Saudi Arabia : सौदी अरेबिया वसवणार अत्याधुनिक नवे शहर | पुढारी

Saudi Arabia : सौदी अरेबिया वसवणार अत्याधुनिक नवे शहर

रियाध : सौदी अरेबियात नव्या बदलांचे वारे वाहत आहे. अद्ययावत शहरे विकसित करण्याकडेही सौदीचा कल वाढला आहे. सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी बुधवारी रियाधमधील जगातील सर्वात मोठे आधुनिक ‘डाऊनटाऊन‘ विकसित करण्यासाठी 180 अब्ज रियालपर्यंत तेलविरहित जीडीपीसह ‘मुरब्बा‘ प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली.

सौदी अरेबियाच्या म्हणण्यानुसार, नवीन मुरब्बा प्रकल्पाची रचना ‘सस्टेनबिलिटी’ संकल्पनेवर आधारित असेल, ज्यामध्ये चालणे आणि सायकलिंगचे मार्ग असलेले हिरवे क्षेत्र असेल जे निरोगी, सक्रिय जीवनशैली आणि सामुदायिक घडामोडींसाठी प्रोत्साहन देऊन जीवनाचा दर्जा वाढवेल. 334,000 नोकर्‍या निर्माण करण्याव्यतिरिक्त 104,000 घरे आणि 9,000 हॉस्पियुनिटस् प्रदान करण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. हा अत्याधुनिक प्रकल्प ‘नॉन-आईल’ आधारित अर्थव्यवस्थेच्या आधारे विकसित केला जात आहे, ज्यामुळे भविष्यात सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था मजबूत होईल.

या प्रकल्पात एक प्रतिष्ठित संग्रहालय, एक तंत्रज्ञान आणि डिझाईन विद्यापीठ, एक बहुउद्देशीय इमर्सिव्ह थिएटर आणि 80 हून अधिक मनोरंजन आणि सांस्कृतिक ठिकाणे असतील. तसेच, चांगल्या कनेक्टिव्हिटीनुसार, विमानतळ सुमारे 20 मिनिटांच्या अंतरावर असेल. मुरब्बा प्रकल्प रियाधच्या वायव्येस किंग सलमान आणि किंग खालिद रस्त्यांच्या सीमेवर स्थित असेल, ज्यामध्ये 19 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये लाखो रहिवाशांना सामावून घेतले जाईल.

या प्रकल्पाच्या आधारे सौदी अरेबिया भविष्यातील वाढत्या लोकसंख्येला उत्तम घरे आणि राहण्यायोग्य घरे देऊ शकणार आहे. या योजनांमुळे सौदी अरेबियाच्या पर्यटन उद्योगालाही चालना मिळणार आहे. या प्रकल्पात ‘मुकाब‘चे निर्माण देखील असणार आहे. जो एक प्रतिष्ठित लँडमार्क असून ज्यामध्ये नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आहे. मुकाबच्या डिझाईनमध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा असणार आहेत. ती 400 मीटर उंच, 400 मीटर रुंद आणि 400 मीटर लांब असणारी जगातील सर्वात मोठी बांधलेली रचना असेल. हा प्रकल्प 2030 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.

Back to top button