‘ज्यूस’ मोहिमेतून होणार गुरूच्या बर्फाळ चंद्रांचे निरीक्षण | पुढारी

‘ज्यूस’ मोहिमेतून होणार गुरूच्या बर्फाळ चंद्रांचे निरीक्षण

वॉशिंग्टन : सध्या जगभरातील खगोल शास्त्रज्ञ मंगळ ग्रहावर एके काळी जीवसृष्टीचे अस्तित्व होते का याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याद़ृष्टीने अनेक ग्रह व त्यांच्या चंद्रांचेही निरीक्षण केले जात असते. आपल्या ग्रहमालिकेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरू. निव्वळ वायूचा मोठा गोळा असलेल्या या ग्रहाला तब्बल 92 लहान-मोठे चंद्र आहेत. त्यापैकी 76 चंद्र हे 10 किलोमीटरपेक्षा कमी व्यासाचे आहेत.

युरोपासारखे चार मोठे चंद्र गुरूला आहेत ज्यांच्याकडे संशोधकांचे लक्ष असते. आता गुरूचे व त्याच्या चंद्रांचे नव्याने निरीक्षण करण्यासाठी व तेथील जीवसृष्टीच्या शक्यतेचा शोध घेण्यासाठी नवी ‘ज्यूस’ ही मोहीम सुरू होणार आहे. या मोहिमेत विशेषतः गुरूच्या बर्फाळ चंद्रांचे निरीक्षण केले जाणार आहे.

जगभरात सध्या पृथ्वी व्यतिरिक्त अन्य कोणत्या ग्रहावर पाणी अथवा जीवसृष्टी आहे, याविषयी संशोधन सुरू आहे. गुरू ग्रहाभोवती सापडलेल्या चंद्रांविषयी संशोधनासाठी युरोपियन स्पेस एजन्सी गयाना स्पेस सेंटर येथून 13 एप्रिल रोजी या ‘ज्यूस’ मोहिमेचे प्रक्षेपण केले जाईल. स्पेसक्राफ्ट किंवा मून एक्सप्लोररला ‘जेयूआयसीई’ असे नाव देण्यात आले आहे. बर्फाळ जगात आणि विविध प्रकारच्या वायूंमध्ये जीवन शक्य आहे का हे देखील ही मोहीम शोधेल. एरियन-5 रॉकेटच्या माध्यमातून ते प्रक्षेपित केले जाईल. लाँच करण्यापूर्वी, तज्ज्ञ ‘ज्यूस’ची चाचणी आणि तपासणी करत आहेत. हे अंतराळ यान प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल आणि त्यात 10 उपकरणे असतील. ते 8 वर्षे संशोधन करेल आणि 2031 मध्ये परत येईल.

‘ज्यूस’ गुरूवरील जीवसृष्टी शोधण्याचा प्रयत्न करेल, तसेच त्याचे किती चंद्र बर्फाळ आहेत, याचा देखील शोध घेईल. गुरूपासून सूर्याचे अंतर 77 कोटी 80 लाख किलोमीटर आहे. हे सूर्यापासून पृथ्वीच्या अंतरापेक्षा पाचपट जास्त आहे. गुरूचे चुंबकीय क्षेत्र सौरमालेतील इतर कोणत्याही ग्रहापेक्षा अधिक मजबूत आहे. त्याच्या वातावरणात मिथेन, पाण्याचे बाष्प, अमोनिया आणि सिलिकॉन सारखी संयुगे सापडली आहेत.

Back to top button