लिओनार्डोला माहिती होता गुरुत्वाकर्षण व गतीचा संबंध? | पुढारी

लिओनार्डोला माहिती होता गुरुत्वाकर्षण व गतीचा संबंध?

लंडन : युरोपमधील पुनर्जागृतीच्या काळातील एक हरहुन्नरी कलाकार म्हणजे लिओनार्डो-दा-विंची. ‘मोनालिसा’सारखी अजरामर चित्रकृती बनवणारा हा कलाकार एक शिल्पकार, स्थापत्यविशारद, गणितज्ज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, अभियंता अशा अनेक पैलूंनी बनलेल्या व्यक्तिमत्त्वाचा होता. लिओनार्डोची अनेक स्केचेस, नोंदी आजही संशोधनाचा विषय बनलेली आहेत. आता त्याच्या आतापर्यंत अज्ञात राहिलेल्या स्केचेसवरून असे दिसून आले आहे की अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या आधी अनेक शतके या माणसाला गुरुत्वाकर्षण आणि गती यांच्यामधील संबंध ठावूक होता.

जारमधून वाळूसारखे कण खाली ओतले जात असताना त्यांनी बनवलेले विशिष्ट त्रिकोण विंचीने या स्केचेसमधून दर्शवलेले आहेत. खाली पडणार्‍या कणांचा हा प्रयोग गुरुत्वाकर्षण हे गतीचेच एक रूप आहे हे दर्शवणारा आहे. ही बाब आईन्स्टाईनच्या 400 वर्षे आधी या कलाकाराला ठाऊक होती असे दिसून येत असल्याचे एका नव्या संशोधनात म्हटले आहे.

गुरुत्वाकर्षण आणि गती ही एकच असल्याचा सिद्धांत सर्वप्रथम अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी 1907 मध्ये मांडला. त्याला ‘इक्विव्हॅलन्स प्रिन्सिपल’ असे म्हटले जाते. आयझॅक न्यूटनने सन 1687 मध्ये गुरुत्वाकर्षण शक्तीचा जो सिद्धांत मांडला होता त्याचा तसेच 1604 मध्ये गॅलिलिओ गॅलीलीने मांडलेल्या ‘लॉ ऑफ फ्रीफॉल’ म्हणजेच हवेचा प्रतिरोध नसताना सर्व वस्तू एकाच गतीने खाली कोसळतात या सिद्धांताचा विस्तार यामधून आईन्स्टाईनने केला होता. मात्र, आईन्स्टाईनच्या आधीच गुरुत्वाकर्षण शक्ती व गतीचा अभ्यास लिओनार्डो-दा-विंचीने केला होता असे त्याच्या वाळूच्या कणांच्या स्केचेसवरून समजून येते, असे कॅलटेकमधील एरोनॉटिक्स अँड मेडिकल इंजिनिअरिंगमधील मोरी घारीब यांनी म्हटले आहे.

Back to top button