

पॅरिस : एखाद्या गावातून किंवा इमारतीमधून आंतरराष्ट्रीय सीमा गेल्याची अनेक उदाहरणे जगाच्या पाठीवर आहेत. अगदी आपल्या देशातही भारत व म्यानमारची सीमा असलेले लोंगवा नावाचे गाव आहे. या गावातील नागरिकांना दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. हे गाव दोन्ही देशांमध्ये विभागलेले आहे. असे एक हॉटेल युरोपमध्ये आहे. या हॉटलेचा अर्धा भाग हा फ्रान्स तर अर्धा भाग हा स्वित्झर्लंडमध्ये आहे. त्यामुळे या हॉटलचे दोन पत्ते आहेत. हे हॉटेल फ्रान्स आणि स्वित्झर्लंडच्या सीमेवर असल्याने फ्रान्समध्ये ते 'ला क्योर फ्रान्स रुए डे ला फ्रोंटेरा' येथे आहे. तर स्वित्झर्लंडमध्ये ते क्वेर्का येथे आहे. एक छोटे कुटुंब हे हॉटेल चालवते. तसेच हे हॉटेल 'को ल अर्बेजी' म्हणूनही ओळखले जाते.
या हॉटेलचा एक मोठा इतिहास आहे. 1862 मध्ये, स्विस आणि फ्रेंच सरकारांनी डेप्सच्या खोर्यातील सीमा बदलण्याचे मान्य केले. 8 डिसेंबर 1862 रोजी डॅप्सच्या तहावर स्वाक्षरी झाली. या करारानुसार सध्या सीमेवर असलेली कोणतीही इमारत बाधित होणार नाही, असा नियम होता. याचाच फायदा पोंथास या व्यावसायिकाने घेतला आणि आपल्या मालमत्तेच्या परिसरात इमारत बांधली. ही इमारत सीमेच्या दोन्ही बाजूला होती. ही तीन मजली इमारत 1863 मध्ये कराराच्या आधीच पूर्ण झाली होती. या कराराला स्वित्झर्लंडच्या सरकारने मान्यता दिली होती. पूर्वी येथे एक दुकान होते, जे 1921 पर्यंत होते. त्यानंतर पोंटसचा मुलगा ज्युल्स-जीन अर्बेजने त्याचे फ्रँको-सुईस हॉटेलमध्ये रूपांतर केले, जे आजही अस्तित्वात आहे.
दुसर्या महायुद्धात जर्मन सैन्यातून पळून जाणार्यांसाठी हॉटेलच्या दुसर्या मजल्यावर निर्वासित शिबिर उभारण्यात आले होते. या हॉटेलमधून त्यांनी शिडीच्या साहाय्याने सीमा ओलांडली. खोल्यांमध्ये उच्च दर्जाचे बेड, फ्री वाय-फाय आणि खासगी स्नानगृहे आहेत. दोन लोकांसाठी एका खोलीची किंमत 89 युरो (7,876 रुपये) पासून सुरू होते आणि चार जणांच्या कुटुंबासाठी 129 युरो (रु. 11,416) आहे. या हॉटेलमध्ये बार फ्रान्समध्ये तर स्नानगृहे स्वित्झर्लंडमध्ये आहेत. दोन्ही देशांची सीमा इमारतीतील जवळजवळ प्रत्येक खोलीला विभाजित करते.
लंच रूम ही फ्रेंच-स्विस सीमारेषेने विभागलेली आहे आणि खोलीच्या विरुद्ध टोकाला दोन ध्वज आहेत. काही खोल्यांमध्ये, अतिथी फ्रान्समध्ये डोके तर स्वित्झर्लंडमध्ये पाय ठेवून झोपतात. तर काही खोल्यामध्ये अर्धा बेड फ्रान्समध्ये आहे आणि अर्धा बेड स्वित्झर्लंडमध्ये आहे. जर एखादे जोडपे या बेडवर झोपले असतील तर एक जोडीदार फ्रान्समध्ये आणि दुसरा स्वित्झर्लंडमध्ये असतो. येथे येणारे लोक दोन्ही देशांच्या संस्कृतीचा आनंद घेतात.