लंडन : जिब्राल्टर मधील व्हॅनगार्ड गुहेत गेल्या 40 हजार वर्षांपासून वाळूने बंद राहिलेल्या गुप्त कक्षाचा शोध लावण्यात आला आहे. याठिकाणी राहणार्या निएंडरथल मानवांच्या जीवनाविषयी अधिक माहिती या शोधामुळे मिळू शकेल असे संशोधकांना वाटते.
जिब्राल्टर नॅशनल म्युझियमचे संचालक क्लाईव्ह फिनलेसन यांनी सांगितले की वाळूने बंद करण्यात आलेला हा गुहेतील कक्ष 40 हजार वर्षांपूर्वीचा आहे. त्याचा काळ हा निएंडरथल प्रजातीच्या मानवांच्या काळातील आहे. युरेशियामध्ये दोन लाख ते 40 हजार वर्षांच्या काळात मानवाची ही प्रजाती याठिकाणी राहत होती.
फिनलेसन आणि त्यांच्या सहकार्यांनी गेल्या महिन्यापासून याठिकाणी संशोधन सुरू केले होते. त्यांना याठिकाणी एक पोकळ जागा असल्याचे आढळले. ही जागा 43 फूट लांबीची असल्याचे दिसून आले. आता ज्याठिकाणी हा कक्ष सापडला आहे त्याच्या जवळच चार वर्षांपूर्वी निएंडरथल माणसाच्या चार वर्षांच्या बालकाचा दुधाचा दातही सापडला होता.
याठिकाणी असलेल्या गुहांमध्ये निएंडरथल माणसांचा निवास होता याचे अनेक पुरावे आतापर्यंत सापडलेले आहेत. अवजारे, दागिन्यांसारखे वापरली जाणारी पक्ष्यांची पिसे व अन्यही अनेक वस्तू याठिकाणी सापडल्या आहेत.