जमिनीखाली ३५ फूट खोलीवर हॉलिडे होम | पुढारी

जमिनीखाली ३५ फूट खोलीवर हॉलिडे होम

वॉशिंग्टन : अमेरिकेतील अर्कान्सास प्रांतात ‘बेकहम क्रीक केव्ह लॉज’ या नावाने ओळखले जाणारे हॉलिडे होम आहे. हे हॉलिडे होम म्हणजेच एके काळचे विशाल बंकर आहे! शीतयुद्धाच्या काळात अणुबॉम्बच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी जमिनीखाली 35 फूट खोलीवर तब्बल 6 हजार चौरस फूट जागेत हे बंकर तयार करण्यात आले होते. आता या न्युक्लिअर बंकरचे रूपांतर हॉलिडे होममध्ये झाले आहे.

256 एकर परिसरातील याठिकाणी पर्यटक राहू-फिरू शकतात. सहा सीटर यूटीव्ही राईड अपदरम्यान ते गुंफांमधील नैसर्गिक झरे पाहू शकतात. या आलिशान बंकरमध्ये एकूण बारा लोक आरामात मुक्काम करू शकतात. बंकरचे कोट्यवधी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले व त्याचे रूपांतर हॉटेलमध्ये झाले.

तिथे चार बेडरूम आणि चार बाथरूम आहेत. तसेच सुसज्ज असे आलिशान स्वयंपाकघर आणि डायनिंग रूमही आहे. या बंकरमध्ये एका रात्रीसाठी पर्यटकांना तब्बल 1 लाख 18 हजार रुपये खर्च करावे लागतात. ही मालमत्ता 2018 मध्ये विकली गेली होती.

ती लिलावात 20 कोटी 13 लाखांहून अधिक रक्कम देऊन खरेदी केली गेली. त्यानंतर नूतनीकरण करून तिला असे पर्यटनस्थळ बनवण्यात आले. जमिनीखालील नैसर्गिक खडक, झरे तसेच ठेवून एखाद्या गुहेतील आलिशान घरासारखे हे लॉज सजवण्यात आले आहे.

Back to top button