लायनफिश या माशामुळे लकवा आणि मृत्यूचा धोका! | पुढारी

लायनफिश या माशामुळे लकवा आणि मृत्यूचा धोका!

लंडन : जगभरात माशांच्याही अनेक प्रजाती आढळतात. त्यापैकी काही प्रजाती माणसासाठी अतिशय धोकादायकही असतात. असाच एक मासा आहे ज्याचे नाव आहे ‘लायनफिश’. या माशाच्या डंखामुळे माणसाला लकवा येऊ शकतो तसेच प्रसंगी जीवही जाऊ शकतो. असाच एक मासा ब्रिटनच्या किनार्‍याजवळ आढळल्याने तिथे सध्या चिंतेचे वातावरण आहे.

हा मासा अशा ठिकाणी सापडला आहे जिथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. 39 वर्षांच्या अरफॉन समर्स याने सहा इंचाच्या लायनफिशला पकडले. त्याच्या शरीरात विषाने भरलेली तेरा हाडे आहेत. सर्वसाधारणपणे लायनफिश दक्षिण प्रशांत महासागर आणि हिंद महासागरात आढळतो. मात्र, जागतिक तापमानवाढीचा या माशांवरही परिणाम झालेला आहे.

त्यामुळे हे मासे सध्या भूमध्य सागरातही फैलावले आहेत. हे मासे जिथे जातात तेथील सागरी जलचरांनाही धोका निर्माण करतात. समुद्र तलवआंचे म्हणणे आहे की अरफॉनने ज्या लायनफिशला पकडले आहे तो इटलीमधून ब्रिटनपर्यंत आलेला असावा. लायनफिशची लांबी पाच ते 45 सेंटीमीटर दरम्यान असते व वजन दीड किलोपर्यंत असते.

त्याचे पेक्टोरल फिन्स आणि विषारी डंख अतिशय वेदनादायक असतात. त्याच्या डंखामुळे श्वास घेण्यास त्रास होतो तसेच उलटी होते. या माशाच्या डंखामुळे माणसाला अर्धांगवायूचा झटकाही येऊ शकतो तसेच हा डंख प्रसंगी प्राणघातकही ठरू शकतो.

Back to top button