अपत्यांसाठी मोठा त्याग करतात व्हेल मासे | पुढारी

अपत्यांसाठी मोठा त्याग करतात व्हेल मासे

लंडन : अनेक वर्षांच्या संशोधनानंतर आता असे दिसून आले आहे की किलर व्हेल मासे पिल्लांसाठी मोठे बलिदान देत असतात. हे मासे एका नर अपत्याला जन्म दिल्यानंतर बहुतांश वेळेला पुन्हा प्रजनन करण्याच्या क्षमतेचे राहत नाहीत.

उत्तर प्रशांत महासागरात करण्यात आलेल्या एका संशोधनातून किलर व्हेल माशांच्या प्रजनन प्रक्रियेविषयी थक्क करणारी माहिती समोर आली आहे. सुमारे दहा वर्षे वैज्ञानिकांनी या अनोख्या सागरी जलचराचे निरीक्षण व अध्ययन केले आणि त्यांना आढळले की या प्रजातीमध्ये नर अपत्य निर्माण करणे अतिशय कठीण काम असते. त्यासाठी त्यांना आजीवन बलिदान द्यावे लागते. एक नर अपत्य निर्माण करण्यासाठी किलर व्हेल माशांच्या माद्यांना भविष्यात पुन्हा आई बनण्याची शक्यता अतिशय कमी होते.

अशा अपत्याला जन्म देणे व त्याचे पालनपोषण करणे यासाठी त्यांना मोठीच ऊर्जा खर्च करावी लागते. नर अपत्यांना दूध पाजवण्यामुळे त्यांच्या आरोग्यावर बराच परिणाम होतो व त्या पुन्हा पिल्लांना जन्म देण्यास सक्षम राहत नाहीत. एक्सटर युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक डॅरेन क्रॉफ्ट या संशोधनात सहभागी झाले होते. त्यांनी सांगितले की माता आपला आहार आणि ऊर्जा या पिल्लांसाठी खर्च करतात. किलर व्हेलसाठी आपले कुटुंब अतिशय महत्त्वाचे असते. त्या अखेरपर्यंत आपल्या कुटुंबाशी बांधलेल्या राहतात.

युवा माद्या मोठ्या झाल्या की आईपासून स्वतंत्र होतात; पण नर आपल्या आईवरच अवलंबून असतात. आपल्या आईने पकडलेल्या शिकारीपैकी मोठा हिस्साही ते मागतात. ‘करंट बायोलॉजी’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. सेंटर फॉर व्हेल रिसर्चद्वारे याबाबत अनेक वर्षे संशोधन करण्यात आले. किलर व्हेल प्रजातीवर 40 वर्षांपेक्षाही अधिक काळापासून वेगवेगळे संशोधन केले जात असून त्यासाठी त्यांच्या समूहावर लक्ष ठेवले जात आहे. 1976 पासून हे संशोधन सुरू आहे.

Back to top button