अंतराळात आता कुठे आहे ‘ती’ कार? | पुढारी

अंतराळात आता कुठे आहे ‘ती’ कार?

न्यूयॉर्क : अंतराळात आतापर्यंत कुत्रा, माकड यांच्यापासून ते मनुष्यप्राण्यापर्यंत अनेक प्राणी गेलेले आहेत. मात्र, अंतराळात चक्क कारही गेली आहे हे तुम्हाला आठवते का? एलन मस्क यांची कंपनी ‘स्पेस एक्स’ने 2018 मध्ये एक कार अंतराळात लाँच केली होती. ही कार अद्यापही सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत आहे. सध्या ही कार पृथ्वीपासून कोट्यवधी किलोमीटर अंतरावर आहे.

‘स्पेसएक्स’च्या या ‘रोडस्टर’ कारने अंतराळात सुमारे 4 अब्ज किलोमीटरचा प्रवास केला आहे. 2020 मध्ये ही कार मंगळापासून 80 लाख किलोमीटर अंतरावरून गेली होती. अर्थात ती सध्या नेमकी कुठे आहे व ती एकाच तुकड्यात आहे की तिचे अनेक तुकडे झाले आहेत हे सांगता येणे कठीण आहे. एखादी उल्का किंवा लघुग्रहाशी धडकून तिचे अनेक तुकडे झालेले असण्याचाही संभव आहे. 2018 नंतर ही कार प्रत्यक्षपणे पाहण्यात आलेली नाही.

स्पेसएक्सच्याच ‘फाल्कन’ या हेवी रॉकेटच्या सहाय्याने ही कार अंतराळात सोडण्यात आली होती. सध्या या कारबाबत जो डाटा आहे तो ट्रॅजेक्टरीच्या अनुमानानुसार बनवण्यात आला आहे. खगोलशास्त्रज्ञ या कारला सातत्याने ट्रॅक करू शकत नाहीत, याचे कारण म्हणजे हे अत्यंत खर्चिक होऊन बसेल. 2018 मध्ये ही कार अनेक इस्टर एग्ज ठेवून लाँच करण्यात आली होती. कारमध्ये चालक सीटवर स्पेससूट घातलेला एक मानवी पुतळाही ठेवण्यात आला होता. या पुतळ्याला ‘स्ट्रोमॅन’ असे नाव देण्यात आले होते. कारच्या डॅश बोर्डवर ‘डोंट पॅनिक’ लिहिलेले होते!

Back to top button