ब्लेडच्या मध्यभागी का असते पोकळ जागा? | पुढारी

ब्लेडच्या मध्यभागी का असते पोकळ जागा?

नवी दिल्ली : दाढी करण्यात पुरुष मंडळींचा आठवड्यातील बराचसा वेळ जात असतो. मात्र, ब्लेडची रचना पाहिल्यावर हे असेच का याचा प्रश्न क्वचितच कुणाला पडत असेल. ब्लेडच्या मध्यभागी मोकळी जागा का असते याचा विचार कधी केला आहे का?

ब्लेड कोणत्याही कंपनीचे असले तरी त्याचे डिझाईन सारखेच असते. तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात गेलात तरी ब्लेडच्या मधोमध मोकळी जागा असल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल; पण ही मोकळी जागा ठेवण्याचे कारण काय असते? याचा काय फायदा होतो? 1901 मध्ये सर्वात प्रथम किंग कँप जिलेटने विलियम निकर्सनच्या मदतीने ब्लेड तयार केले होते. जिलेट कंपनीने या ब्लेडचे पेटंटही घेतले आणि 1904 पासून त्याची निर्मिती सुरू केली. त्यांनीच याचे डिझाईन तयार केले होते. यादरम्यान ब्लेडचा वापर फक्त आणि फक्त दाढी करण्यासाठी केला जात होता.

यामुळे याचे डिझाईन अशा पद्धतीने करण्यात आले होते की रेजरचे बोल्ट त्यात फिट बसतील. याच कारणास्तव त्याच्या मधोमध मोकळी जागा ठेवण्यात आली होती. त्यावेळी मार्केटमध्ये जिलेट वगळता कोणतीही स्पर्धक कंपनी नव्हती. ब्लेडच्या व्यवसायातून नफा होत असल्याचे लक्षात येताच अनेक कंपन्या मार्केटमध्ये स्पर्धेत उतरल्या होत्या. मात्र, त्यावेळी फक्त जिलेटच शेव्हिंग रेजरची निर्मिती करत होते. त्यामुळे कोणतीही कंपनी असली तरी त्यांना ब्लेडचे डिझाईन बदलणे शक्य नव्हते. सध्या दिवसाला 10 लाखांहून अधिक ब्लेड तयार केले जातात.

Back to top button