Space Babies : आता अंतराळातही विकसित होईल मानवी भ्रूण | पुढारी

Space Babies : आता अंतराळातही विकसित होईल मानवी भ्रूण

लंडन : सध्या अंतराळ संशोधनाबरोबरच वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनही नव्या उंचीवर पोहोचलेले आहे. या दोन्हीच्या मिलाफातून भविष्यात अंतराळातही मनुष्याचे बाळ अस्तित्वात येऊ शकेल. ब्रिटिश वैज्ञानिक आता डच कंपनी ‘स्पेसबॉर्न युनायटेड’च्या सहकार्याने ’असिस्टेड रिप्रोडक्शन टेक्नॉलॉजी इन स्पेस’ मॉड्यूल बनवत आहेत. या अंतर्गत अंतराळात जैव उपग्रह पाठवण्यात येणार आहे. याच्या आत, ‘इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन’ म्हणजेच ‘आयव्हीएफ’ तंत्राद्वारे भ्रूण विकसित होईल. (Space Babies) ते पृथ्वीवर आणून स्त्रीच्या गर्भात स्थापित केले जाईल. पृथ्वीवर अशा पद्धतीने जन्माला आलेल्या या मुलांना ‘स्पेस बेबीज’ म्हटले जाईल.

या तंत्रामध्ये संशोधक 75 सेंटीमीटरच्या एका डिस्कमध्ये ‘आयव्हीएफ’ ट्रिटमेंटसाठी उपकरण बसवतील. ही डिस्क पृथ्वीपासून 230 किलोमीटर उंचीवर पाठवण्यात येईल. याठिकाणी सोलर रेडिएशन मर्यादित असते. ‘आयव्हीएफ’ डिव्हाईस अंतराळातही गुरुत्वाकर्षण निर्माण करील. त्याच्या नियंत्रित तापमानात शुक्राणू आणि स्त्रीबीज (Space Babies) यांचे फलन केले जाईल. त्यापासून निर्माण झालेला भ्रूण पाच दिवसांनंतर फ्रीज करून पृथ्वीवर आणला जाईल व तो एखाद्या महिलेच्या गर्भात स्थापित केला जाईल. त्यापासून बाळ विकसित होऊन त्याचा जन्म झाल्यावर त्याला ‘स्पेस बेबी’ असे संबोधले जाईल.

अर्थात मानवी भ्रूण विकसित (Space Babies) करण्यापूर्वी उंदरांच्या भ्रूणाबाबत चाचणी केली जाईल. स्पेसबॉर्नचे संस्थापक डॉ. एगबर्ट एडेलब्रोक यांनी सांगितले, या प्रकल्पाचा अंतिम उद्देश पृथ्वीच्या बाहेर नैसर्गिकरीत्या मुले जन्माला घालणे हा आहे. मात्र, त्याआधी सध्याच्या तंत्रज्ञानाची अवकाशात चाचणी घ्यायची आहे. यानंतरच अंतराळात लैंगिक संबंध, गर्भधारणा आणि प्रसूतीवर लक्ष केंद्रीत केले जाईल. या प्रकल्पासाठी प्रथम उंदरांवर प्रयोग केला जाणार आहे. त्यांचे शुक्राणू आणि अंडबीजे अंतराळात फलित होतील.

मॉड्यूलचे तंत्रज्ञानाची चाचणी घेणारे पहिले उड्डाण एप्रिलमध्ये कॅनडातून होईल. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, आयव्हीएफ कार्यरत असलेला एक पूर्ण-कार्यक्षम जैव-उपग्रह 18 ते 24 महिन्यांत तयार होईल. स्पेसबॉर्नला (Space Babies) एसगार्डिया कंपनीचे सहकार्य आहे. ही कंपनी 2016 मध्ये स्थापन झाली होती. अंतराळात जगातील पहिली मानवी वसाहत उभारणे हा त्याचा उद्देश आहे. कंपनीचा दावा आहे की या वसाहतीसाठी 10 लाख लोकांनी आधीच नोंदणी केली आहे. डॉ. एडेलब्रोक सांगतात की, येत्या 5 वर्षांत मानवी पेशींसह जैव उपग्रह अवकाशात पाठवता येतील. तसेच अंतराळात पहिल्या मानवी भ्रूणाची निर्मिती 2031 पर्यंत होऊ शकते.

हेही वाचा : 

Back to top button