ध्रुवीय भागात टिपले अनोखे आवाज | पुढारी

ध्रुवीय भागात टिपले अनोखे आवाज

लंडन : एखादा बर्फ जणू काही गात आहे, सील जणू काही अंतराळात असल्यासारखा आवाज काढत आहे आणि गाळातील ‘एअरगन’ एखाद्या बॉम्बस्फोटासारखा ध्वनी निर्माण करीत आहे…यापूर्वी कधीही न ऐकलेले असे आवाज आता ध्रुवीय भागातील पाण्याखाली रेकॉर्ड करण्यात आले आहेत. दोन मरीन अकौस्टिक लॅब्सनी असे 50 दुर्मीळ आवाज रेकॉर्ड करून ते जनतेसाठी खुले केले आहेत.

पृथ्वीवरील महासागरही आता गोंगाटाने भरत आहेत व त्यामागेही माणसाचा हस्तक्षेपच कारणीभूत होत आहे. मात्र, महासागरांमधीलही काही स्वतःचे ध्वनी असतात. यापैकी अनेक ध्वनी यापूर्वी ऐकण्यात आले नव्हते. संशोधक आणि आर्टिस्ट डॉ. गेरेंट र्‍हीज व्हिटकर यांनी सांगितले की बहुतांश लोकांसाठी हे आवाज अगदी परग्रहवासीयांसारखेच अज्ञात आहेत. ध्रुवीय आवाज कसे असतात याबाबत आपण विचार करीत असतो; पण अनेक वेळा त्या निव्वळ कल्पनाच असतात. आर्क्टिक आणि अंटार्क्टिका म्हणजेच उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर काही तरंगणार्‍या वैज्ञानिक उपकरणांसह अंडरवॉटर मायक्रोफोन्स दोन वर्षांपूर्वी पाण्यात सोडण्यात आले होते.

या मायक्रोफोन्सनीच हे अज्ञात आवाज टिपले आहेत. त्यापैकी एक आवाज अंटार्क्टिकावरील सील या जलचरांचा आहे. या जलचरांपर्यंत पोहोचणे कठीण काम असते. त्यांची हाक या रेकॉर्डमधून ऐकू येते. रॉस सील हे खुल्या समुद्रात राहतात आणि हिमनगावरही त्यांचे अस्तित्व असते. त्यांच्यापर्यंत पोहोचणे यामुळेच शक्य होत नसते. अशा सीलचे पाच प्रकारचे आवाज या मायक्रोफोन्सनी टिपलेले आहेत. तसेच क्रॅबइटर सील, मिंकी व्हेल्स, नारव्हेल्स आणि हम्पबॅक व्हेल्सचे आवाजही टिपलेले आहेत. हिमनग कोसळत असतानाचे आवाजही यामधून ऐकू येतात. बर्फाचा जणू काही गीत गुणगुणल्यासारखा किणकिणता आवाजही यामध्ये टिपला गेला आहे.

Back to top button