‘पर्सिव्हरन्स’ने पूर्ण केले नमुन्यांच्या राखीव साठ्याचे काम | पुढारी

‘पर्सिव्हरन्स’ने पूर्ण केले नमुन्यांच्या राखीव साठ्याचे काम

न्यूयॉर्क : ‘नासा’च्या ‘पर्सिव्हरन्स’ या रोव्हरने मंगळभूमीवरील खडक-मातीच्या नमुन्यांचा तिथेच राखीव साठा तयार करण्याचे काम आता पूर्ण केले आहे. तिथे या रोव्हरने नमुने ठेवलेल्या काही ट्यूब्स जमिनीवर विखरून टाकल्या आहेत. भविष्यातील मंगळ मोहिमेवेळी या ट्यूब्स गोळा करून त्या पृथ्वीवर आणल्या जातील. हा अशा नमुन्यांचा सुरक्षित ठेवण्यात आलेला राखीव साठा आहे.

मंगळावरील खडक-मातीचे नमुने पृथ्वीवर अभ्यासासाठी प्रयोगशाळेत आणले जावेत अशी संशोधकांची इच्छा आहे. मंगळावर भूतकाळात जीवसृष्टीचे अस्तित्व होते का हे तपासून पाहण्यासाठी या नमुन्यांचा अभ्यास उपयुक्त ठरू शकतो. त्यासाठी असे नमुने गोळा करून ते दहा टायटॅनियम सिलिंडरमध्ये म्हणजेच छोट्या ट्यूब्समध्ये गोळा करून ते मंगळभूमीवरील धुळीत टाकले गेले आहेत. अशीच एक ट्यूब सोबतच्या छायाचित्रातही दिसत आहे.

पर्सिव्हरन्स हे रोव्हर 45 किलोमीटरचा व्यास असलेल्या व एखाद्या कटोर्‍यासारख्या दिसणार्‍या भव्य अशा जेझेरो नावाच्या विवरात आहे. अब्जावधी वर्षांपूर्वी याठिकाणी एक विशाल सरोवर होते असे मानले जाते. याठिकाणी त्याकाळात सूक्ष्म जीवांच्या स्वरूपात जीवसृष्टी होती का याचे पुरावे शोधले जात आहेत. त्यासाठीच तिथे ड्रील करून पर्सिव्हरन्सने हे खडक-मातीचे नमुने गोळा केले आहेत. मात्र, ते पृथ्वीवर सुखरूप आणण्यासाठी ‘नासा’ने हा ‘प्लॅन बी’ तयार केलेला आहे. मंगळावरील नमुने पृथ्वीवर आणले जात असताना दीर्घ प्रवासात काही दुर्घटना घडली तर काही नमुने सुरक्षित राहावेत यासाठी या ट्यूब्स विखरून टाकलेल्या आहेत.

Back to top button