जपानमध्ये सापडली चौथ्या शतकातील तलवार

टोकियो : जपानमध्ये पुरातत्त्व संशोधकांना उत्खननात चौथ्या शतकातील तब्बल 7.5 फूट लांबीची तलवार सापडली आहे. दफन केलेल्या मृत व्यक्तीचे वाईट शक्तींपासून रक्षण करण्यासाठीच्या विधीत अशा तलवारीचा वापर केला जात होता, असे म्हटले जात आहे. नारा शहराजवळील एका ठिकाणी ही लोखंडी तलवार आणि ब्राँझच्या आरशासारखे दिसणारे शिरस्त्राणही सापडले आहे.
ही तलवार इतकी मोठी आहे की युद्धात किंवा अन्य वेळी एखादे शस्त्र म्हणून तिचा वापर करता येणे ही अशक्य बाब आहे. त्यामुळे तिचा प्रतीकात्मक रूपाने अन्य कामासाठी वापर केला जात असावा हे स्पष्टपणे दिसते. कदाचित दफन केलेल्या व्यक्तीचे वाईट शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी अशी तलवार पुरली जात असावी. पुरातत्त्व संशोधक रिकू मुरासे यांनी सांगितले की ही तलवार पाहून आम्ही आश्चर्यचकीतच झालो. ती इतकी मोठ्या आकाराची होती की ती खरी आहे की नाही याबाबतच आम्हाला शंका आली. जपानमध्ये अनेक प्राचीन थडग्यांमध्येही यापूर्वी तलवारी सापडल्या आहेत; पण ही तलवार अतिशय मोठ्या आकाराची आहे.