माशाच्या पाककृतीचा सापडला प्राचीन पुरावा | पुढारी

माशाच्या पाककृतीचा सापडला प्राचीन पुरावा

लंडन : जगभरातील अनेक लोकांच्या आहारात मासे असतात. नदीतील व समुद्रातील माशांच्या अनेक डिशेस बनवल्या जात असतात. मात्र, आता संशोधकांनी प्राचीन काळात मासे शिजवले जात होते याचा एक जुना पुरावाही शोधून काढला आहे. उत्तर इस्रायलमध्ये 7 लाख 80 हजार वर्षांपूर्वीच्या माशाचे अवशेष सापडले असून त्यावरून त्या काळातही माणूस मासे नीट शिजवून खात होता असे दिसून आले आहे.

संशोधकांनी म्हटले आहे की कच्चे मांस खाण्यापासून ते मांस शिजवून खाण्यापर्यंतचा मानवाचा प्रवास यामधून दिसून येतो. यापूर्वीचा असा पुरावा 1 लाख 70 हजार वर्षांपूर्वीचा होता. त्यापेक्षाही जुना पुरावा आता शोधण्यात आला आहे. कार्प फिशसारख्या एका माशाचे हे अवशेष संशोधकांना गवसले आहेत. हा मासा 6.5 फूट लांबीचा होता. गेशर बेनोत याकुब आर्कियोलॉजिकल साईटवरील उत्खननावेळी या माशाचे अवशेष सापडले आहेत.

हे ठिकाण गॅलिलीच्या समुद्रापासून 14 किलोमीटर अंतरावर आहे. तेल अवीव युनिव्हुर्सिटीतील डॉ. इरित झोहर यांनी याबाबतच्या संशोधनाचे नेतृत्व केले. त्यांनी या माशाच्या दातांवरील इनॅमलमध्ये असणार्‍या काही स्फटिकांचा अभ्यास केला. हे स्फटिक विशिष्ट पद्धतीने फुलले होते. त्यावरून असे दिसते की हा मासा थेट आगीवर न भाजता तो मंद आचेवर नीट शिजवण्यात आलेला होता. अशा पद्धतीने मांस नीट शिजवून ते खाण्यास माणसाने त्यावेळी सुरुवात केलेली होती हे दिसून येते.

Back to top button