दोन तार्‍यांची धडक अन् अंतराळात सोन्याचे झरे | पुढारी

दोन तार्‍यांची धडक अन् अंतराळात सोन्याचे झरे

वॉशिंग्टन : अंतराळातून तुम्हाला चक्क सोन्याचे झरे दिसले तर… कल्पना मोठी नयनरम्य आहे. पण, थांबा. ही केवळ कविकल्पना नव्हे. वास्तवातही असे घडू शकते. याचे कारण म्हणजे खगोलशास्त्रज्ञांनी प्रथमच एका अशा तारकामंडळाचा शोध लावला आहे. हे तारकामंडळ एक दिवस सुपर-शक्तिशाली किलोनोव्हा स्फोट घडवून आणेल आणि त्यातून सोन्याचे झरे फुटतील. शास्त्रज्ञांनी दोन न्यूट्रॉन तारे शोधून काढले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, या तार्‍यांची लवकरच एकमेकांशी टक्कर होणार आहे. हा अंतराळातील सर्वात शक्तिशाली स्फोटांपैकी एक असेल.

आतापर्यंत शास्त्रज्ञांनी असे फक्ीत 10 तारकामंडळ शोधून काढले आहेत. त्यामुळे हा शोध अत्यंत खास मानला जात आहे. खगोलशास्त्रज्ञांनी बायनरी स्टार सिस्टीम शोधण्यासाठी चिलीमधील सेरो टोलोलो इंटर-अमेरिकन वेधशाळेत दीड मीटर दुर्बिणीचा वापर केला. ही प्रणाली आपल्या आकाशगंगेमध्ये पृथ्वीपासून सुमारे 11,000 प्रकाशवर्षांच्या अंतरावर स्थित आहे. शोधलेल्या नव्या तारकामंडळातकिलोनोव्हा घटना होण्यासाठी सर्व योग्य घटक आहेत. हे संशोधनाचे नेचर जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

सर्वात पहिले तारकामंडळ नासाच्या नील गेहरल्स स्विफ्ट वेधशाळेने शोधून काढले होते. त्यानंतर खास दुर्बिणीद्वारे त्याचे विश्लेषण करण्यात आले. यामुळे खगोलशास्त्रज्ञांना त्याची कक्षीय वैशिष्ट्ये आणि तार्‍यांचे विविध प्रकार ओळखणे शक्य झाले. या विषयाचा अभ्यास करताना शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, या ब्रह्मांडात एक न्यूट्रॉन तारा असून तो अल्ट्रा-स्ट्रीप सुपरनोव्हाद्वारे तयार झाला आहे. अल्ट्रा-स्ट्रीप सुपरनोव्हा म्हणजे विशालकाय तार्‍याचा स्फोट होणे. या किलोनोव्हा इव्हेंटसाठी खगोलशास्त्रज्ञ अत्यंत उत्साहित आहेत. कारण, किलोनोव्हा कसे तयार होते आणि जगातील महत्त्वपूर्ण घटकांच्या उत्पत्तीवर यामागचे रहस्य त्यातून उघड होईल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो.

Back to top button