पाण्याइतकीच घनता असलेल्या वेगळ्या बर्फाची निर्मिती | पुढारी

पाण्याइतकीच घनता असलेल्या वेगळ्या बर्फाची निर्मिती

वॉशिंग्टन : संशोधकांनी आता एका वेगळ्या प्रकारच्या बर्फाची निर्मिती करण्यात यश मिळवले आहे. अतिथंड तापमान आणि स्टीलचे काही बॉल बियरिंग यांचा वापर करून त्यांनी एक नवा, विचित्र बर्फ बनवला आहे. या बर्फाचे वैशिष्ट म्हणजे त्याची घनता अगदी द्रवरूप पाण्याइतकीच आहे.

या बर्फाला ‘मीडियम-डेन्सिटी अ‍ॅमॉर्फस आईस’ असे म्हटले जाते. गोठलेल्या पाण्यामधील पोकळीतही हा बर्फ बसू शकतो. अशी पोकळी भरता येत नाही असेच यापूर्वी मानले जात होते. पृथ्वीवर नैसर्गिकरीत्या क्रिस्टलाईन आईस म्हणजेच बर्फाचे स्फटिक बनत असतात. मात्र, या नव्या बर्फात नियोजनबद्ध रेणू रचना नाही. उलट यामधील रेणू हे विसंगत आणि गोंधळाच्या स्थितीमध्ये असल्यासारखे आहेत. त्यांची रचना ही बहुतांशी काचेमधील स्थितीसारखी आहे. या स्थितीला ‘अ‍ॅमॉर्फस’ असे म्हटले जाते.

यापूर्वी अ‍ॅमॉर्फस आईसचे काही प्रकार बनवलेले आहेत; पण अशा पद्धतीचे बर्फ एक तर पाण्यापेक्षा अधिक घनता असलेले किंवा कमी घनता असलेले होते. मात्र, आता बनवलेला हा अ‍ॅमॉर्फस बर्फ नव्या ‘गोल्डीलॉक्स’ प्रकारचा आहे. त्याची घनता अगदी द्रवरूप पाण्याच्या घनतेइतकी आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘सायन्स’ या नियतकालिकात देण्यात आली आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या ख्रिस्तोफ साल्झमन यांनी याबाबतचे संशोधन केले आहे.

Back to top button