AI feature : ‘गुगल’ सर्च इंजिनमध्ये जोडणार ‘एआय’ फीचर | पुढारी

AI feature : ‘गुगल’ सर्च इंजिनमध्ये जोडणार ‘एआय’ फीचर

वॉशिंग्टन : सध्याचा जमाना ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा आहे. ‘एआय’चा वापर अनेक क्षेत्रांमध्ये केला जात आहे. जगातील सर्वात लोकप्रिय सर्चइंजिन ‘गुगल’ही त्यापासून अलिप्त राहिलेले नाही. गुगल लवकरच आपल्या सर्च इंजिनमध्ये ‘एआय’ फीचर जोडणार आहे. गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाईंनी ही माहिती दिली आहे. चौथ्या तिमाहीची आर्थिक आकडेवारी जारी करताना ते म्हणाले की यूझर लवकरच इंटरनेट सर्चमध्ये लेटेस्ट लँग्वेज मॉडेलसह थेट संवाद साधण्यास सक्षम होतील.

सर्चदरम्यान तथ्यात्मक आणि सामान्य संवाद शैलीत रिझल्ट दाखवण्यासाठी गुगल ‘लॅम्डा’ म्हणजेच ‘लँग्वेज मॉडेल फॉर डायलॉग अ‍ॅप्लिकेशन’चा वापर करेल. पिचाई म्हणाले की, ‘आम्ही आटिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत. सर्वोत्तम अजून बाकी आहे.’

गुगलची स्पर्धक ‘मायक्रोसॉफ्ट’ची गुंतवणूक असलेली कंपनी ‘ओपनएआय’चा चॅटबॉट चॅटजीपीटी सध्या जगभरात चर्चेत आहे. जगातील तीन मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांचा नफा डिसेंबरच्या तिमाहीत घटला आहे. गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटचा नफा सर्वाधिक घटला आहे. उत्पन्न आणि नफ्यातील घट यामुळे त्रस्त टेक कंपन्यांनी खर्च कपातीला सुरुवात केली आहे.

Back to top button