Powerful Magnetor : सूर्याहून हजारो पट अधिक लख्ख प्रकाश, अंतराळातील रहस्यामुळे शास्त्रज्ञही अवाक् | पुढारी

Powerful Magnetor : सूर्याहून हजारो पट अधिक लख्ख प्रकाश, अंतराळातील रहस्यामुळे शास्त्रज्ञही अवाक्

वॉशिंग्टन : अंतराळामध्ये अनेक रहस्ये लपली असून त्यांची अद्याप सार्‍या जगाला कल्पनाही नाही. जगभरातील शास्त्रज्ञांकडून या रहस्यांचा उलगडा करण्यासाठी सातत्याने संशोधन सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शास्त्रज्ञांनी पृथ्वीसारख्या दिसणार्‍या एका ग्रहाचा (Powerful Magnetor) शोध लावला होता आणि आता त्यांनी आणखी एका रहस्याचा उलगडा केला आहे. सूर्याहून हजारो पटींनी जास्त लख्ख आणि तेजस्वी असणारा प्रकाशाचा स्रोत शास्त्रज्ञांनी शोधला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हा प्रकाश आपल्या आकाशगंगेतील सर्व तार्‍यांच्या ऊर्जेहूनही कैकपटीने जास्त ऊर्जा उत्सर्जित करतो.

नेमकी काय आहे ‘ही’ ऊर्जा?

या चमकदार प्रकाश स्रोतातून इतकी ऊर्जा बाहेर पडतेय की, ती उघड्या डोळ्यांनी पाहता येणार नाही. शिवाय, या प्रकाशाचे पृथ्वीपासूनचे अंतरही प्रचंड आहे. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्रोत म्हणजे तप्त वायूचा मोठा गोळा आहे. मात्र, वैज्ञानिकांना हा प्रकाश स्रोत (Powerful Magnetor) नेमका काय आहे, याचे गूढ उकललेले नाही.

पृथ्वीपासून सुमारे 380 दशलक्ष प्रकाशवर्षे दूर अंतराळात शास्त्रज्ञांना सूर्यापेक्षा 57 हजार कोटी पट अधिक तेजस्वी प्रकाश स्रोत सापडला आहे. हा सुपरनोव्हाहूनही 20 पटीने अधिक चमकदार आहे. एखाद्या तार्‍याचे आयुष्य संपते तेव्हा त्याचा मोठा स्फोट होतो. यावेळी अंतराळामध्ये मोठी ऊर्जा आणि प्रकाश उत्सर्जित होतो, यालाच सुपरनोव्हा असे म्हणतात. शास्त्रज्ञांनी शोधलेला नवा प्रकाश स्रोत अशा 20 सुपरनोव्हाहून जास्त लख्ख आणि तेजस्वी आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सुपरनोव्हाला मॅग्नेटॉर असेही संबोधले जाते. शास्त्रज्ञांच्या मते, आतापर्यंत शोधलेल्या सर्व मॅग्नेटॉरपैकी (Powerful Magnetor) हा सर्वात चमकदार आणि सर्वाधिक ऊर्जा देणारा मॅग्नेटॉर आहे. ओहायो स्टेट विश्वविद्यालयातील खगोलशास्त्राचे प्राध्यापक क्रिजिस्तॉफ स्तानेक यांनी सांगितले की, जर हा सापडलेला प्रकाशस्त्रोत मॅग्नेटॉर असेल तर, त्याची ऊर्जा सर्वाधिक आहे.

आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली मॅग्नेटॉर

शास्त्रज्ञांच्या मते, हा मॅग्नेटॉर (Powerful Magnetor) आतापर्यंत सापडलेला सर्वात शक्तिशाली आहे. या प्रकारचा कोणताही सुपरनोव्हा अजूनपर्यंत सापडलेला नव्हता. सामान्य सुपरनोव्हापेक्षा तो 200 पट अधिक प्रकाशमान आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की, जरी आपण आपल्या आकाशगंगेतील सर्व तार्‍यांची चमक एकत्रित केली तरी त्यापेक्षा हा सुपरनोव्हा 20 पट अधिक लखलखणारा आहे.

Back to top button