आता विक्रमी वेळेत मंगळावर पोहोचणे शक्य | पुढारी

आता विक्रमी वेळेत मंगळावर पोहोचणे शक्य

वॉशिंग्टन : आता तुम्हाला मंगळ ग्रहाची सफर करायची असेल तर काही दिवसांतच तिथे पोहोचता येईल. सध्याच्या परिस्थितीत मंगळावर जाण्यासाठी सुमारे सात महिने लागतात. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने अणुशक्तीच्या मदतीने चालणारे रॉकेट तयार करण्याचा संकल्प सोडला आहे. एरवी नासाकडून अंतराळ याने मंगळावर पाठवली जातात. तथापि, अजून मानवाला मंगळावर पाठवणे शक्य झालेले नाही. तसे करणे शक्य आहे काय, याची चाचपणी नासाचे शास्त्रज्ञ करीत आहेत.

नेहमीची अंतराळ याने त्यासाठी उपयोगी ठरणार नसल्यामुळे हे खास प्रकारचे रॉकेट तयार केले जाणार आहे. त्याचा वेग सर्वसाधारण यानापेक्षा 10 हजार पटीने जास्त असणार आहे. या नव्या रॉकेटमधून मानवाला मंगळावर अत्यल्प वेळात जाता येईल. त्यासाठी नासाने डिफेन्स अ‍ॅडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट एजन्सीबरोबर खास करार केला आहे. 2027 पर्यंत हे नवे रॉकेट मंगळाच्या दिशेने भरारी घेण्यासाठी सज्ज होईल, असा नासाच्या शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. 2030 सालापर्यंत मानवाला मंगळावर पाठवण्याचे लक्ष्य नासाने निर्धारित केले आहे. ही योजना वास्तवात उतरली तर यापुढे मंगळावर मानवाला पाठवणे अत्यंत सुलभ होणार आहे.

हिरव्या धूमकेतूची प्रतीक्षा

दरम्यान, तब्बल 50 हजार वर्षांपूर्वी हिरव्या रंगाचा एक धूमकेतू पृथ्वीजवळून गेला होता. आता तो पुन्हा पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. सी 2022 ई थ्री (झेडटीएफ) या नावाच्या धूमकेतूचा शोध गेल्या वर्षी नासाच्या शास्त्रज्ञांनी लावला. नासाने दिलेल्या माहितीनुसार तो 1 फेब्रुवारी रोजी पृथ्वीच्या सर्वात जवळून जाणार आहे. उघड्या डोळ्यांनीदेखील तो पाहता येईल, असे शास्त्रज्ञांनी सांगितले असले तरी तुमच्याकडे दुर्बीण असेल तर त्याचे दर्शन अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. नासाच्या माहितीप्रमाणे पृथ्वीजवळ येण्याचा त्याचा कालावधी आहे 50 हजार वर्ष.

यापूर्वी जेव्हा तो पृथ्वीच्या जवळ आला होता तेव्हा ते अंतर होते 4.2 कोटी किलोमीटर. शास्त्रज्ञांच्या मते 2 फेब्रुवारी रोजीदेखील हा धूमकेतू दिसू शकेल. जर त्याची चमक नेहमीसारखीच असेल तर तो सहज दिसू शकतो. त्यासाठी मग दुर्बिणीची गरजच भासणार नाही. कदाचित त्याची चमक पूर्वीएवढीच असू शकते. मात्र, ती कमी झाली असेल तर दुर्बीण घेऊनच तो पाहता येईल. शास्त्रज्ञदेखील या धूमकेतूचा अभ्यास करण्यासाठी उत्सुक आहेत. अर्थात, हा धूमकेतू पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार असला तरी त्यामुळे कसलाही धोका संभवत नाही.

 

Back to top button