

वॉशिंग्टन : ज्यांची कमाई तुटपुंजी आहे ते महिन्याचा खर्च भागवत असताना काटकसर करतात व तसे करणे ही एक गरजेचीच बाब ठरत असते. मात्र, काही लोक असे असतात ज्यांची कमाई चांगली असूनही ते निव्वळ कंजुष असल्यामुळे पैसे खर्च करण्यास टाळत असतात. अशा कंजुष आणि लोभी लोकांचे अनेक किस्से जगभर प्रसिद्ध आहेत. अशाच एका कोट्यधीश महिलेची जगभर चर्चा आहे जी इतकी श्रीमंत असूनही कंजुषपणा करते. अगदी स्वतःच्या खाण्या-पिण्याच्याबाबतही ती पैसे खर्च करण्यात हात आखडता घेत असते!
या महिलेचे नाव आहे अॅमी एलिझाबेथ. अमेरिकेत लास वेगासमध्ये राहणार्या या 51 वर्षांच्या महिलेस 'जगातील सर्वात कंजुष करोडपती' म्हणून ओळखले जाते. ती एकूण 43 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. मात्र, खाण्या-पिण्यापासून ते कपड्यांपर्यंत अनेक बाबतीत ती कंजुषपणा करते. विशेष म्हणजे पैसे वाचवण्यासाठी ती चक्क मांजरांचे खाद्यपदार्थ स्वतः खाते. तिच्या घरी काम करण्यासाठी एकही नोकर नाही. आपल्या महिन्याच्या खर्चाचे बजेट ती आधीच तयार करते व त्याचे कसोशीने पालन करते. तिचे महिन्याचे हे बजेट 80 हजार रुपयांचे असते. त्यापेक्षा एक रुपयाही अधिक खर्च होऊ नये याची ती काळजी घेते. ती आपल्या घटस्फोटित पतीच्या घरातच राहते आणि घराची साफसफाई हा तिचा पूर्वाश्रमीचा नवराच करतो.
सफाईसाठीही ती बिलकूल खर्च करीत नाही. घरातील इलेक्ट्रिक उपकरणांचा ती अधिक वापर करीत नाही जेणेकरून विजेचे बिल अधिक येऊ नये. तिनेच एका मुलाखतीत सांगितले की बर्याच वेळा तिने मांजरांचे अन्न खाल्ले होते आणि घरी आलेल्या पाहुण्यांनाही मांजराचे अन्न दिले होते! खरेदी करताना ती पॅक्ड सामानाऐवजी स्वस्त मिळणारे खुले सामान घेते. ही महिला रियल इस्टेटमध्ये पैसा गुंतवते. त्यामुळे तिची संपत्ती वाढतच आहे. तसेच ती बिझनेस कन्सल्टंटही आहे व पुस्तकेही लिहिते. कमाई व संपत्ती चांगली असूनही आपण कसा कंजुषपणा करतो, हे ती स्वतःच जगजाहीरही करीत असते!