

लंडन : इंग्लंडमध्ये थट्टा-मस्करीत म्हटले जाते की थॉमस क्रेपर नावाच्या प्लम्बरने पहिल्या कमोडची म्हणजेच शौचकुपाची निर्मिती केली. अर्थातच हे खरे नसले तरी सुरुवातीच्या काळातील शौचकुपांची निर्मिती कुणी केली याबाबत अनेकांना कुतुहल असू शकते. अशा शौचकुपांनाही एक मोठा इतिहास आहे.
शौचकुपांचे सर्वात जुने उल्लेख पाच हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन मेसोपोटामियामधील आहेत. सध्याच्या इराक-इराणच्या परिसरात ही प्राचीन संस्कृती नांदत होती. त्यावेळी लांब, सिरॅमिकच्या ट्यूब्जना जोडलेले असे साधे, खड्डेवजा शौचकुप अस्तित्वात होते. या शौचकुपांचे डिझाईन कुणी केले त्यांची नावे काळाच्या उदरात गडप झालेली आहेत. त्यानंतर सुमारे एक हजार वर्षांनी प्राचीन मिनोअन संस्कृतीमधील शौचकुपांचे उल्लेख सापडतात. ही संस्कृती ग्रीसच्या क्रेट बेटावर होती.
तेथील सार्वजनिक शौचालयांमध्ये मैला दूर वाहून टाकण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली होती. हीच पद्धत पुढे रोमन लोकांनी स्वीकारली. मैला वाहून नेणार्या गटारीवरच अर्धवर्तुळाकार जागेत असे शौचकुप बनवलेले असत. पहिला आधुनिक फ्लश टॉयलेट हा सन 1596 मध्ये सर जॉन हॅरिंग्टन या ब्रिटिश माणसाने बनवला. तो महाराणी एलिझाबेथ पहिली हिच्या दरबारातील व्यक्ती होता. सध्याच्या आधुनिक फ्लश टॉयलेटसारखी व्यवस्था असलेला पहिला शौचकुप स्कॉटिश संशोधक अॅलेक्झांडर कमिंग यांनी सन 1775 मध्ये बनवला. त्याचे त्यांनी पेटंटही घेतले होते. त्यांच्या या टॉयलेटमध्ये अद्ययावत वॉल्व सिस्टीम होती.