101 वर्षांच्या आजीबाईंच्या दीर्घायुष्याचे रहस्य...नृत्य

लंडन : आपल्याकडे ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार हेमामालिनी यांना त्यांच्या तंदुरुस्तीचे रहस्य विचारल्यावर त्या नेहमीच ‘नृत्य’ असेच उत्तर देतात. नृत्यामधून आनंदही मिळतो व चांगला व्यायामही होत असतो. ब्रिटनमधील 101 वर्षांच्या एका आजीबाईंनीही त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य नृत्यामध्ये असल्याचे म्हटले आहे. त्या या वयातही ठणठणीत आहेत आणि जीवनाचा आनंद घेत आहेत.
या आजीबाईंचे नाव आहे डिंकी फ्लॉवर्स. त्या ब्रिटनमधील सर्वाधिक वयाच्या व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांना चार नातवंडे आहेत. लोकांनी त्यांच्या जीवनात नृत्यकलेचा समावेश करावा यासाठीच माझा प्रयत्न सुरू असतो व हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे असे त्या सांगतात. त्या म्हणाल्या, मी नृत्याशिवाय राहू शकत नाही. माझ्या आनंदी वृत्तीचे किंवा वयाच्या तुलनेत तरुण राहण्याचे हेच रहस्य आहे.
नृत्याची सुरुवात वयाच्या कोणत्याही वर्षापासून केली जाऊ शकते. त्यामध्ये कधीही ‘उशीर झाला’ अशी बाब संभवत नाही. डिंकी या एकेकाळी व्यावसायिक नर्तकी होत्या. वयाच्या अवघ्या तिसर्या वर्षापासूनच त्यांनी नृत्य करणे सुरू केले होते. आजही त्या आपल्या डान्स स्कूलमध्ये मुलांना नृत्यकला शिकवतात. त्यांच्या डान्स स्कूलचे नाव ‘डिंकी फ्लॉवर्स स्टेज स्कूल’ असे आहे. तन-मनाने स्वतःला तरुण ठेवण्यासाठी नृत्य करीत राहा, असे त्या सर्वांना सांगतात. आपण शेवटच्या श्वासापर्यंत नृत्य करीत राहू, असेही त्या म्हणतात.