एक चित्रपट जीवघेणा… | पुढारी

एक चित्रपट जीवघेणा...

वॉशिंग्टन : जागतिक चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अनेक अजरामर चित्रपट बनलेले आहेत. मात्र, हॉलीवूडमध्ये 1956 मध्ये प्रदर्शित झालेला ‘द काँकरर’ हा चित्रपट वेगळ्या अर्थाने संस्मरणीय ठरला. मंगोल शासक चंगेज खान याच्या प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट अनेकांसाठी जीवघेणाच ठरला. 1951 ते 1955 या काळात अमेरिकेने सातत्याने अणुचाचण्या घेतल्या होत्या. 1954-55 मध्ये या चित्रपटाचे शूटिंग अणुचाचणीच्या ठिकाणापासून 220 किलोमीटर अंतरावर सुरू होते. विषारी हवा आणि टेस्ट साईटवरून उडत आलेल्या विषारी धुलीकणांनी भयावह परिणाम दाखवला. या चित्रपटाच्या 220 लोकांच्या युनिटमधील 91 लोकांना कर्करोग झाला आणि हळूहळू 46 जणांना प्राण गमवावे लागले!

मृत्युमुखी पडणार्‍या या लोकांमध्ये चित्रपटाचा हीरो, हीरोईन, दिग्दर्शक यांच्यासह अनेकांचा समावेश होता. अधिक ‘रियल शॉटस्’, परिपूर्णता आणि ‘कहाणी की डिमांड’ असे मोठे मोठे शब्द वापरून तसेच कलाकारांशी खोटे बोलून या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यात आले होते. त्याचा परिणाम म्हणून चित्रपटाशी संबंधित अनेकांना गंभीर आजाराच्या विळख्यात अडकावे लागले. संपूर्ण स्टार-कास्टपैकी केवळ दोन-तीन लोकच असे उरले होते ज्यांना कर्करोग झाला नाही व ते बचावले.

चित्रपटाच्या शूटिंग साईटवर अणुचाचणीच्या रेडिएशनचा इतका खतरनाक परिणाम होता की शूटिंग पाहण्यासाठी आलेल्या अनेक कलाकारांच्या कुटुंबीयांनाही कर्करोग झाला. चित्रपटासाठी मोठा पैसा खर्च झाला, अनेकांचे प्राण गेले; पण इतके होऊन हा चित्रपट अपयशीच ठरला. जगातील सर्वात भिक्कार चित्रपटांमध्ये या चित्रपटाची गणना होते. ‘सर्वात वाईट चित्रपटा’चा पुरस्कारही याच चित्रपटाला मिळाला! अनेकांच्या जीवनात या चित्रपटाने नैराश्य आणले, अनेकांनी आत्महत्याही केल्या व काहीजण ड्रग्जच्या विळख्यातही अडकले. हा चित्रपट हॉवर्ड हगीज यांनी निर्माण केला होता व डिक पॉवेल हे दिग्दर्शक होते. जॉन वेन, सुझान हेवर्ड आणि अ‍ॅग्नेस मुरहेड असे कलाकार यामध्ये होते.

Back to top button