सागरी कचरा काढताना सापडला सोन्याच्या नाण्यांचा खजिना | पुढारी

सागरी कचरा काढताना सापडला सोन्याच्या नाण्यांचा खजिना

माद्रिद : समुद्राच्या निळ्याशार पाण्याखाली किती रहस्ये दडली आहेत, याची कल्पना न केलेलीच बरी. कारण समुद्रात सातत्याने काही ना काही तरी गूढ सापडतच असते. स्पेनच्या समुद्रात नुकताच सोन्याच्या नाण्यांचा खजिना सापडला आहे. ही नाणी सुमारे दीड हजार वर्षांपूर्वीची असल्याचा अंदाज आहे.

स्पेनमधील अलिकांटे येथील समुद्राच्या या भागाला ‘लुई लेन्स’ आणि ‘सेजर जमिनो’ या नावाने ओळखले जाते. तेथेच हे दोन डायव्हर्स समुद्राच्या सुमारे 7 मीटर खोल तळाशी जाऊन कचरा काढत होते. यावेळी त्यांच्या हाताला सोन्याचे एक नाणे सापडले. हे नाणे 10 सेंटचे होते.

त्या दोघांनी ते नाणे आपल्या जहाजात आणले. या नाण्यावर ग्रीक अथवा रोमन चेहरा दिसून आला. यामुळे या दोन्ही डायव्हर्सनी ज्या ठिकाणी नाणे सापडले तेथे पुन्हा डुबकी मारली. तेथे त्यांनी तब्बल दोन तास खोदाई केली. या खोदाईत त्यांना तब्बल 53 सोन्याची नाणी सापडली.

‘युनिव्हर्सिटी ऑफ अलिकांटे’चे जैमी मोलिना यांनी सांगितले की, आतापर्यंत सापडलेला हा सर्वात मोठ्या रोमन नाण्यांचा खजिना आहे. या नाण्यांच्या अभ्यासातून पश्चिमी रोमन साम्राज्याचा अचूक कालावधी समजू शकतो. यावर रोमनच्या विविध राजांची चित्रे आहेत.

मोलिना यांच्या मते, खोदाईवेळी येथे एखाद्या बुडालेल्या जहाजाचे अवशेष मिळाले नाहीत. एखाद्या अ‍ॅलनसारख्या शत्रूपासून सुरक्षित ठेवण्यासाठीच नाण्यांचा हा खजिना येथे सुरक्षित ठेवला गेला असणार. यातून रोमन साम्राज्याला कोणती तरी भीती वाटत होती, हेच सिद्ध होते. ही नाणी आता स्पेनमधील म्युझियममध्ये ठेवली जातील.

Back to top button