इयरफोन तासन् तास वापरत असाल तर आताच व्हा सावधान! | पुढारी

इयरफोन तासन् तास वापरत असाल तर आताच व्हा सावधान!

नवी दिल्ली : सध्या सर्व वयोगटातील लोक इयरफोन वापरत असल्याचे दिसत आहेत. प्रामुख्याने युवावर्गच इयरफोन वापरण्यावर भर देताना दिसतो. हे गॅझेट वापरणे काही चुकीचे नाही. मात्र तासन् तास इयरफोनचा वापर करणे नुकसानकारक ठरू शकते. गेल्या काही वर्षांमध्ये इयरफोन वापरल्याने कान खराब होणे आणि यामुळे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. सध्याच्या काळात ही एक गंभीर समस्या बनून समोर येऊ लागली आहे.

सुमारे 50 टक्के युवकांमध्ये सलग अनेक तास इयरफोन वापरल्याने कानासंबंधीचे आजार वाढले आहेत. यामुळे कानात वेदना होणे, डोके दुखणे, झोप न येणे अशा समस्यांमध्ये भर पडली आहे. नवी दिल्लीतील इयर स्पेशालिस्ट डॉ. ए. वहाब यांनी सांगितले की, ऐकण्यासाठी एकसारखा वापर केल्याने ऐकण्याची क्षमता 40 डेसिबलने कमी होते. यामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

सातत्याने इयरफोन वापरल्याने कानाचा पडदा व्हायब्रेट होतो आणि यामुळे तो खराब होण्याची शक्यता बळावते. यामुळे कानात अनेक प्रकारचे आवाज येणे, चक्कर येणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. खासकरून दूरचा आवाज ऐकू येईनासा होतो. यामुळे प्रसंगी बहिरेपण येण्याची शक्यता बळावते.

तसे पाहिल्यास सुमारे 85 डेसिबलपर्यंतचा आवाज कान सहन करू शकतो. मात्र, जर हाच आवाज 85 डेसिबलपर्यंत गेल्यास कानांसाठी धोका निर्माण होतो. इयरफोनच्या मदतीने 40 तासाहून अधिक वेळ जर 90 डेसिबलपर्यंतचा आवाज ऐकला तर कानाच्या नसा डेड होऊ शकतात.

Back to top button