shark teeth : नऊ वर्षांच्या मुलीला सापडला सर्वात मोठ्या शार्कचा दात | पुढारी

shark teeth : नऊ वर्षांच्या मुलीला सापडला सर्वात मोठ्या शार्कचा दात

लंडन : लहान वयातही अनेक मुलांना प्रागैतिहासिक काळातील प्राण्यांविषयीच्या संशोधनात रस असतो. अशाच एका अवघ्या नऊ वर्षांच्या मुलीने मेरीलँडच्या किनारपट्टीवर प्राचीन काळातील शार्कचे 400 पेक्षाही अधिक दात व अन्य जीवाश्म नमुने गोळा केलेले आहेत. आता या चिमुरड्या जीवाश्म संशोधिकेला मेगालोडोन या शार्कचा (shark teeth) तब्बल पाच इंच लांबीचा दात सापडला आहे. मेगालोडोन हे पृथ्वीवरील महासागरांमध्ये वावरलेले आतापर्यंतचे सर्वात महाकाय शार्क होते.

या मुलीचे नाव आहे मोल्ली सॅम्पसन. तिला मेरीलँडच्या कॅल्वर्ट क्लिफ्स स्टेट पार्कमध्ये किनार्‍यावरील उथळ पाण्यात हा पाच इंच म्हणजेच 13 सेंटीमीटर लांबीचा दात सापडला. मोल्ली आणि तिची थोरली बहीण नताली या दोघीही ‘फोसाईल हंटर’ म्हणूनच ओळखल्या जातात. दोघींनाही जीवाश्म संशोधन करण्याची आवड आहे. मोल्लीला नाताळच्या दिवशीचा हा शार्कचा दात (shark teeth) सापडला आणि तिने तो सोलोमन्समधील कॅल्वर्ट मरीन म्युझियममधील पॅलिओंटोग्लॉयचे क्युरेटर स्टीफन गॉडफ्रे यांना सुपुर्द केला.

हा शोध ‘वन्स इन ए लाईफटाईम’ (आयुष्यात एकदा!) अशा थाटाचा असल्याचे उद्गार गॉडफ्रे यांनी काढले. मेगालोडोन हे 23 दशलक्ष ते 2.6 दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात होते. हे शार्क (shark teeth) तब्बल 65 फूट लांबीचे होते. मात्र त्यांच्यापेक्षा आकाराने लहान, पण यशस्वी ठरलेल्या ग्रेट व्हाईट शार्कच्या उदयानंतर शार्कची ही महाकाय प्रजाती नामशेष झाली.

हेही वाचा : 

Back to top button