पाचव्या शतकातील शाही थडग्याचा शोध | पुढारी

पाचव्या शतकातील शाही थडग्याचा शोध

लंडन : रोमानियामध्ये नव्या हायवेचे काम सुरू असताना अपघातानेच एका श्रीमंत योद्ध्याचे आणि त्याच्या घोड्याचे थडगे सापडले. हे थडगे इसवी सनाच्या पाचव्या शतकातील आहे. त्या काळात हा परिसर हुण लोकांच्या ताब्यात होता. या थडग्यामध्ये शंभरपेक्षाही अधिक कलाकृती व अन्य वस्तू आहेत. त्यामध्ये शस्त्रे, सोन्याचे आवरण असलेल्या वस्तू, सोन्याचे रत्नजडीत दागिने आदींचा समावेश आहे.

बुखारेस्टमधील व्हॅसिली पारवान इन्स्टिट्यूट ऑफ आर्कियोलॉजीमधील सिल्विवू एने यांनी याबाबतची माहिती दिली. या थडग्याबाबत संशोधन करणार्‍या संशोधकांच्या पथकाचे ते प्रमुख आहेत. दक्षिण रोमानियात काळ्या समुद्रापासून सुमारे 220 किलोमीटर अंतरावर असलेल्या मिझिल या शहराजवळ हायवेचे काम सुरू असताना हे थडगे आढळून आले होते.

या रस्त्याच्या कामावेळी वेगवेगळ्या चार पुरातत्त्व स्थळांचा शोध लागलेला आहे. त्यामध्येच या श्रीमंत योद्ध्याच्या थडग्याचा समावेश आहे. तो कदाचित राजकुमारही असू शकतो, असे संशोधकांना वाटते. या संपूर्ण परिसरात अनेक पुरातत्त्वीय महत्त्वाची ठिकाणे असल्याचे दिसून आले आहे. हुण हे मूळचे मध्य आशियातील लढाऊ घोडेस्वार होते. चौथ्या आणि पाचव्या शतकाच्या काळात त्यांनी पूर्व युरोपवर आक्रमण करून त्याच्यावर ताबा घेतला.

Back to top button