गुवाहाटी : नदीच्या पात्रात असलेले केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वात मोठे बेट 'माजुली' (Majuli island) नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले जाते. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीत असलेले हे बेट 2040 पर्यंत पूर्णपणे नष्ट होईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. नदीला अधिक-मोठ्या प्रमाणावर पूर आल्यामुळे हा परिणाम होणार असून, नदीकिनारी राहणार्यांनाही त्याचा धोका पोहोचणार आहे.
ब्रह्मपुत्रा नदी हिमालयातून वाहत येते. या नदीचे पात्र सुमारे 2900 किमीचे असून, ही नदी बंगालच्या उपसागराला मिळते. या जलमार्गावर अनेक लोक अवलंबून आहेत. मात्र, हवामान बदलामुळे मान्सूनच्या काळात नदीला पूर येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा नदीकिनारी राहणार्यांच्या जीवनावर मोठा परिणाम होणार आहे. या नदीतच हे 'माजुली' बेट (Majuli island) असून, सन 1853 च्या नोंदीनुसार त्याचे क्षेत्रफळ 1246 वर्ग किलोमीटर होते, तर 2001 च्या सर्व्हेनुसार ते आता 421.65 वर्ग किलोमीटर झालेले आहे. 'माजुली' बेटावर सुमारे 1 लाख 70 हजार लोक राहतात. मानवी गैरव्यवस्थापनामुळे निर्माण झालेल्या समस्येचा परिणाम येथील रहिवाशांवर होण्याची भीती आहे.
पुरामुळे या बेटाचा अधिकाधिक भाग दीर्घकाळ पाण्याखाली (Majuli island) जात आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत असून, बेटावरील जमीन नापीक होत आहे. पाऊस आल्यावर बेटावर राहणारे मिशिंग आदिवासी लोक आपल्या जनावरांना घेऊन उंचावरील भागात स्थलांतरित होतात. मात्र, येत्या काळात स्थलांतरित होण्यासाठी त्यांना जागाच शिल्लक राहणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा :