बाळाचे नाव सुचवण्यासाठी ‘ती’ घेते लाखोंचे मानधन | पुढारी

बाळाचे नाव सुचवण्यासाठी ‘ती’ घेते लाखोंचे मानधन

न्यूयॉर्क : हल्ली कोण, कशा मार्गाने पैसा मिळवेल हे काही सांगता येत नाही. सोशल मीडियामुळे तर हल्ली अक्षरशः ‘कमाईचे हजार मार्ग’ बनवलेले आहेत. एका तरुणीने तर नवजात बाळाचे नाव काय ठेवता येईल याबाबतचा सल्ला देण्याच्या मार्गाला आपले कमाईचे साधन बनवलेले आहे. ती यासाठी लाखो रुपये मानधन घेते!

नव्या बाळाची चाहूल लागली की, लगेच एकदम हटके नाव शोधण्याची तयारी सुरू होते. पूर्वी लोक एखाद्या देवाच्या, फुलाच्या, राजाच्या-आज्याच्या, अगदीच ‘हटके’ म्हणजे हिरो हिरॉईनच्या नावावरून आपल्या लेकरांची नावे ठरवायची. पण अलीकडे ट्रेंड, सीझन, आई-बाबांच्या नावाचा हॅशटॅग, अगदी विज्ञान वापरून एक भलतंच नाव तयार केलं जातं. नाव ठरवण्याची पद्धत जरी बदलली असली तरी वर्षानुवर्षे नाव ठरवण्याचा मान हा बाबांच्या बहिणीकडे म्हणजेच बाळाच्या आत्याबाईंकडेच असतो. पण आता या आत्याबाईंचा मान घेऊन या तरुणीने हा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. इन्स्टाग्रामवर प्रचलित असणारी प्रोफेशनल ‘बेबी नेमर’ म्हणजेच थोडक्यात लहान मुलांचे नाव सुचविण्याचे काम करणारी तरुणी सध्या चर्चेत आली आहे. टेलर ए.

हम्फ—े ही अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये राहणारी तरुणी श्रीमंतांना त्यांच्या मुलांसाठी अर्थपूर्ण नावं सुचवते आणि त्यासाठी किमान 1500 डॉलर्स म्हणजे 1 लाखांपेक्षाही जास्त रुपये घेते. काही श्रीमंतांनी तर तिच्या कामावर खूश होऊन 10,000 डॉलर्स म्हणजे 7 लाखांपेक्षाही अधिक मानधन दिले आहे. दरम्यान, 2015 मध्ये टेलरने सोशल मीडिया अकाऊंटवर बाळांची नावे आणि त्याचा अर्थ शेअर करायला सुरुवात केली. या इन्स्टाग्राम व्हिडीओजला मिळणार्‍या प्रतिसादाला पाहता, 2018 मध्ये तिने आपले हे टॅलेंट व्यवसायात रूपांतरित केले. त्यामुळे आता ही टेलर एका अर्थी जगातील सगळ्यात खर्चिक आत्या ठरली आहे!

Back to top button