Moon of Saturn : शनीच्या चंद्रावर बर्फाचे खड्डे! | पुढारी

Moon of Saturn : शनीच्या चंद्रावर बर्फाचे खड्डे!

वॉशिंग्टन : आपल्या ग्रहमालिकेतील शनी (Moon of Saturn) व गुरू हे दोन अनेक नैसर्गिक उपग्रह म्हणजेच चंद्र असलेले ग्रह आहेत. पृथ्वीला एकच चंद्र असला तरी शनीचे 83 आणि गुरूचे 80 चंद्र आहेत हे विशेष! शनीच्या 80 पेक्षाही अधिक चंद्रांपैकी ‘टायटन’, ‘एन्सेलाडस’सारखे काही चंद्र संशोधनाच्या दृष्टीने विशेष आहेत. ‘एन्सेलाडस’ हा शनीचा सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा चंद्र आहे. हा चंद्र बर्फाळ असून त्याच्या पृष्ठभागावर बर्फाच्याच अनेक खड्ड्यांची मालिकाच असल्याचे खगोलशास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

एन्सेलाडसच्या पृष्ठभागावर काही ठिकाणी सुमारे 700 मीटर जाडीचाही बर्फ आहे. हा शनीच्या चंद्रांपैकी (Moon of Saturn) सर्वात थंड आणि बर्फाच्छादित असा चंद्र आहे. मात्र या बर्फाच्या आवरणाखाली खार्‍या पाण्याचा व ऊबदार महासागरही आहे. त्यामुळे याठिकाणी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जीवसृष्टीचे अस्तित्व असावे असे खगोल शास्त्रज्ञांना वाटते.

संशोधिका एमिली मार्टिन यांचा दावा आहे की, एन्सेलाडसच्या दक्षिण ध्रुवावर वेगवेगळ्या खोलीवर बर्फाचे अस्तित्व आहे. दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर असलेल्या भेगांमुळे बर्फ बाष्पात रुपांतरित होणेही सुरू होऊ शकते. एन्सेलाडसवरील बर्फाच्या जाड आवरणाखाली (Moon of Saturn) लपलेल्या खार्‍या पाण्याच्या महासागरातून सतत द्रवरूप पाण्याचे फवारे बाहेर उसळत असतात. त्यानंतर हा बर्फ एन्सेलाडसच्या पृष्ठभागावर विविध खड्ड्यांची मालिकाच निर्माण करतो.

वॉशिंग्टनमधील नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियममध्ये सेंटर फॉर अर्थ अँड प्लॅनेटरीत संशोधन करीत असलेल्या एमिली मार्टिन आपल्या सहकार्‍यांसमवेत एन्सेलाडसवरील बर्फाची जाडी आणि घनत्व यावर संशोधन करीत आहेत. त्यांनी म्हटले आहे की, त्यांचे संशोधन भविष्यातील या चंद्रावरील मोहिमेसाठी उपयुक्त ठरेल. जर या चंद्रावर (Moon of Saturn) एखादा रोबो उतरवण्याची योजना असेल तर तेथील कोणत्या पृष्ठभागावर आपण हे करीत आहोत याची माहिती असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : 

Back to top button