वॉशिंग्टन : भेट स्वरूपात कोण, काय देईल हे काही सांगता येत नाही. अमेरिकेतील एका मुलीला तिच्या आई-वडिलांनी भेट म्हणून लॉटरीची (Lottery) तीन तिकिटे दिली होती. आता त्यापैकी एका तिकिटाला 24 लाख रुपयांचे बक्षीस लागल्याचे निष्पन्न झाले आहे.
अमेरिकेतील मेरीलँडच्या जर्मन टाऊनमध्ये ही मुलगी राहते. तिला तिच्या आई-वडिलांनी नाताळनिमित्त काही वस्तू भेट म्हणून दिल्या होत्या. त्यामध्येच एक लिफाफाही होता. या लिफाफ्यात तीन लॉटरीची तिकिटे होती. ही सर्व तिकिटे मेरीलँड लॉटरीच्या पेपरमिंट पेआऊट गेमची होती. या मुलगीने एका पाठोपाठ एक सर्व तिकिटे स्क्रॅच करणे सुरू केले. पहिल्या दोन तिकिटांना किरकोळ बक्षीस मिळाले होते.
मात्र, तिसर्या तिकिटाने तिचे नशीब उघडले. या तिकिटाला 30 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 24.45 लाख रुपयांचे बक्षीस लागले होते. त्यामुळे अर्थातच ही मुलगी व तिच्या आई-वडिलांनाही अत्यानंद झाला. यापूर्वी अमेरिकेतील एका ट्रक चालकालाही लाखो रुपयांची लॉटरी लागली होती.