हा माणूस आहे की रबर? हवे तसे वळवतो शरीर! | पुढारी

हा माणूस आहे की रबर? हवे तसे वळवतो शरीर!

नैरोबी : काही लोकांचे शरीर अत्यंत लवचिक असते. अगदी सुटकेसमध्येही स्वतःच्या देहाचे मुटकुळे करून ही माणसं आरामात बसू शकतात. तसेच शरीर हवे तसे वाकवून इतरांना थक्क करू शकतात. असाच एक माणूस आफ्रिकेत आहे. त्याच्या करामती पाहिल्या की हा माणूस आहे की रबर, असाच एखाद्याला प्रश्न पडू शकतो. आफ्रिकेतील गॅबोन नावाच्या देशात हा अफलातून माणूस राहतो.

या माणसाचे नाव आहे जॉरेस कॉम्बिला. तो व्यवसायाने कंटोशनिस्ट आहे. शरीर हवे तसे वाकवून दाखवण्याच्या कलेला ‘कंटोर्शन’ असे म्हटले जाते. हे कौशल्य ज्यांच्यामध्ये असते त्यांना ‘कंटोशनिस्ट’ म्हणतात. ‘कंटोर्शन’ हा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये मानवी देहाला हवे तसे वाकवून दाखवले जाते. जॉरेसला असे प्रकार करण्याचा वयाच्या सातव्या वर्षापासूनच छंद आहे. तो आपले पाय 180 अंशाच्या कोनावरही ठेवू शकतो. सुरुवातीला अनेकांनी त्याची टवाळी केली तर काहींनी त्याला भूतही ठरवले, मात्र आज तो या व्यवसायात यशस्वी बनला आहे. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असतात.

अनेक ठिकाणी त्याला त्याच्या कलेचे प्रदर्शन करण्यासाठी बोलावले जात असते. तो स्वतः अनेकांना या कलेचे प्रशिक्षणही देतो. आज सोशल मीडियामुळेच त्याची जगभर ओळख निर्माण झालेली आहे. आपल्याला योगासनांचे काही प्रकार कठीण वाटत असतात; पण हा माणूस त्यापेक्षाही थक्क करणारे प्रकार करून दाखवतो!

Back to top button