

वॉशिंग्टन : 'हबल' या अंतराळ दुर्बिणीला पर्याय म्हणून अंतराळात सोडण्यात आलेला 'जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप' सुरुवातीपासूनच थक्क करणारी कामगिरी करीत आहे. आता या दुर्बिणीने तिच्या कारकिर्दीतील पहिला बाह्यग्रह शोधला आहे. हा ग्रह पृथ्वीपासून अवघ्या 41 प्रकाशवर्ष अंतरावर असून तो पृथ्वीप्रमाणेच खडकाळ, कठीण पृष्ठभागाचा आहे; मात्र या ग्रहावर वातावरण आहे का, असेलच तर ते कशा प्रकारचे आहे, याबाबत अद्याप संशोधकांना खात्री नाही. जेम्स वेबने शोधलेला हा पहिलाच ग्रह पृथ्वीइतक्याच आकाराचा आणि तसाच खडकाळ पृष्ठभागाचा आहे, हे विशेष!
या बाह्यग्रहाला 'एलएचएस 475 बी' असे नाव देण्यात आले आहे. तो पृथ्वीच्या व्यासाच्या 99 टक्क्यांइतका आहे. त्याच्यावर कशा प्रकारचे वातावरण आहे, हे स्पष्ट झालेले नसले, तरी ते शनीचा चंद्र टायटनवरील मिथेनचे अधिक प्रमाण असलेल्या वातावरणासारखे नसेल, असे संशोधकांना वाटते. हा बाह्यग्रह पृथ्वीपेक्षा अधिक उष्ण असून तो त्याच्या तार्याभोवतीची एक प्रदक्षिणा दोन दिवसांमध्ये पूर्ण करतो. अशा प्रकारचे बाह्यग्रह हे दुर्बिणीच्या आवाक्यात येत नसतात; पण जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने त्यामधील तंत्रज्ञान किती शक्तिशाली आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.