

नवी दिल्ली : Corona : 'कोव्हिड-19 मुळे पुरुषांमध्ये मजबूत रोगप्रतिकारकता निर्माण होऊ शकते व त्यामुळे या आजारातून बरे झाल्यावर दीर्घकाळपर्यंत त्यांच्या नियमित रोगप्रतिकारक यंत्रणेत बदल दिसून येऊ शकतो, असे संशोधकांनी म्हटले आहे. कोव्हिड-19 नंतर पुरुष अनेक आजारांचा अधिक मजबुतीने सामना करू शकतात.
एखाद्या विषाणूजन्य संक्रमणानंतर शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा पुन्हा स्थिर स्तरावर येत असते, असेच यापूर्वी मानले जात होते; मात्र आता त्यापेक्षा वेगळे निरीक्षण नोंदवण्यात आले असून त्याची माहिती 'नेचर' या नियतकालिकात देण्यात आली आहे. एखादी व्यक्ती पुरुष आहे की स्त्री यावर ही बाब अवलंबून राहू शकते, असे नव्या संशोधनात दिसून आले आहे.
Corona : 'अमेरिकेच्या राष्ट्रीय अॅलर्जी आणि संक्रामक रोग संस्थेच्या संशोधकांनी फ्लूबाबतचे लसीकरण केलेल्या लोकांच्या रोगप्रतिकारक प्रतिक्रियांचे विश्लेषण केले. त्यानंतर त्यांनी या विश्लेषणाची तुलना दोन प्रकारच्या लोकांच्या प्रतिकारक प्रतिक्रियांशी केली. त्यापैकी एका बाजूला असे लोक होते जे कधी कोव्हिड-19 चा जनक 'सार्स-कोव्ह-2' विषाणूने मोठ्या प्रमाणात संक्रमित झाले होते व दुसरीकडे असे लोक होते जे किरकोळ प्रमाणात कोव्हिड-19च्या विळख्यात अडकले होते व त्यामधून बरे झाले.
संशोधकांना आढळले की, कोव्हिड-19 च्या हलक्या संक्रमणातून बरे झालेल्या पुरुषांची रोगप्रतिकारक प्रणालीने महिलांच्या तुलनेत फ्लूच्या लसींवर मजबुतीने प्रतिक्रिया दिली. अमेरिकेच्या येल विद्यापीठातील इम्यूनोबायोलॉजिस्ट जॉन त्सांग यांनी सांगितले की, ही एक आश्चर्यकारक बाब आहे. सर्वसाधारणपणे रोगजनकांबाबत तसेच लसींबाबत महिलांमध्ये मजबूत समग्र प्रतिकारक प्रतिक्रिया पाहायला मिळते; मात्र त्यांच्या स्व-प्रतिरक्षित आजारांनी ग्रस्त होण्याची आशंकाही असते.