टोकियो : लालचुटुक, टपोर्या माणकासारखी दिसणारी द्राक्ष्ये म्हणजे 'रूबी रोमन'. ही लाल द्राक्षे अतिशय महाग फळांमध्ये समाविष्ट आहेत. जपानमध्ये अशा द्राक्ष्यांचे उत्पादन घेतले जाते. मर्यादित स्वरूपात त्यांचे उत्पादन होत असल्याने त्यांना अव्वाच्या सव्वा किंमत मिळत असते. अशा द्राक्ष्यांचा एक घड तब्बल 8 लाख 80 हजार रुपयांनाही विकला गेला आहे.
ही लाल द्राक्षे विकण्यासाठी लिलाव केला जात असतो. द्राक्ष्याचा आकार सामान्य द्राक्ष्यांपेक्षा मोठा असतो आणि ती चवीलाही अधिक गोड असतात. जपानमध्ये इशिकावा प्री फ्रेक्चरल या एकमेव कंपनीकडून या द्राक्ष्याचे उत्पादन घेतले जाते. ही द्राक्षं म्हणजे 'प्रिमियम प्रॉडक्ट'सारखी असल्याने त्यांना मागणी असली तरी त्यांचे उत्पादन मर्यादित असल्याने भावही प्रचंड मिळतो.
सामान्यपणे एक हजार डॉलर्स म्हणजेच 70 हजार रुपयांपर्यंत एक घड मिळत असतो. मात्र, लिलावात त्याला मोठीच किंमत मिळते. अनेकवेळा एका घडातील द्राक्ष्यांची संख्याही ठरलेली असते. काही घडांना मिळणार्या दरानुसार एका द्राक्ष्याची किंमत ही 30 हजार रुपयांपर्यंतही असते.