Trees : 50 लाख झाडे लावण्याचा ‘त्याचा’ संकल्प! | पुढारी

Trees : 50 लाख झाडे लावण्याचा ‘त्याचा’ संकल्प!

लंडन : दक्षिण सेनेगलमधील एका माणसाने येत्या पाच वर्षांच्या काळात 50 लाख झाडे (Trees) लावण्याचा संकल्प सोडला आहे. युरोपमध्ये काही काळ काम केल्यानंतर ज्यावेळी हा माणूस कॅसामान्स क्षेत्रात 2020 मध्ये परतला त्यावेळी त्याने हा संकल्प केला. या माणसाचे नाव आहे अ‍ॅडामा डायमी.

48 वर्षांचा अ‍ॅडामा युरोपमधून आपल्या गावी परतला त्यावेळी गावाचे बदललेले रूप पाहून त्याला धक्काच बसला. त्याच्या तरुण वयात या गावात शेकडो वृक्षांची (Trees) दाटी होती. युरोपमधून परत आल्यावर त्याने पाहिले की गावात केवळ काही मोजकेच वृक्ष शिल्लक राहिलेले आहेत. त्याने सांगितले, केवळ आमच्याच गावात नव्हे तर आजुबाजूच्या गावांमध्येही अशीच स्थिती होती. काही गावांमध्ये तर एकही वृक्ष शिल्लक राहिलेला नव्हता. काही ठिकाणी बोटावर मोजण्याइतकीच झाडे होती. लोकांनी झाडे कापली; पण नव्याने लावण्याचा विचारच केला नाही. बांधकामासाठी किंवा कोळशासाठी बहुतांश झाडे कापली जात असतात.

अ‍ॅडामा यांनी आता कॅसामान्स भागात एका स्पॅनिश एनजीओच्या सहाय्याने नवा उपक्रम सुरू केला असून तो स्वतः प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो. त्याने या प्रकल्पात स्वतःचे 5 हजार डॉलर्स दिलेले आहेत. या वृक्षारोपणाच्या कामात त्याने महिलांनाही मोठ्या संख्येने सहभागी करून घेतले आहे. या महिला विशेष करून बिया पेरून नवी झाडे (Trees) उगवण्यासाठी आपले योगदान देतात. विविध प्रकारचे वृक्ष विकसित करण्याकडे अ‍ॅडामा यांचा कटाक्ष आहे. गेल्या तीन वर्षांच्या काळात 1,42,000 बिया पेरल्या गेल्या असून त्यांच्यामधून आलेल्या रोपांनी मूळही धरले आहे.

हेही वाचा : 

Back to top button