कोंबड्यांना मिळाली चक्क पोलिस कोठडी! | पुढारी

कोंबड्यांना मिळाली चक्क पोलिस कोठडी!

भुवनेश्वर : कोंबड्यांना कधी पोलिस कोठडीत राहावे लागल्याचे तुम्ही ऐकलंय का? हो असा प्रकार समोर आला आहे. ओडिशा राज्यातील बालासोर जिह्यात चार कोंबड्यांना कॉकफायटिंग म्हणजेच कोंबड्यांच्या झुंजीच्या स्पर्धेतून वाचविण्यात आले. यानंतर या कोंबड्यांना दोन दिवसांहून अधिक काळ चक्क पोलिस कोठडीत राहावे लागले. पोल्ट्री पक्षी जप्त करणार्‍या सिमुलिया पोलिस अधिकार्‍यांना ते कोठडीत असताना त्यांना फक्त चाराच नव्हे तर त्यांची अन्यही काळजी घ्यावी लागली.

प्राण्यांवर क्रूरता केली जाणार्‍या कॉकफाइटिंग हा खेळ बेकायदेशीर आहे आणि या स्पर्धेवर मोठ्या प्रमाणात सट्टाही लावला जातो. त्यामुळे सिमुलिया पोलिस वर्षाच्या यावेळी सुरू होणार्‍या आणि जानेवारीच्या मध्यापर्यंत चालणार्‍या सट्टेबाजीच्या कारवायांवर लक्ष ठेवून होते.

पोलिसांनी आखलेल्या नियोजनानुसार, स्पर्धेच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिस अधिकारी तैनात होते आणि खेळ सुरू होताच त्यांनी लगेच कारवाई केली. यानुसार, 25 डिसेंबर रोजी मांजरीपूर गावात मुरुणा ग्रामपंचायत, सिमुलिया येथे झालेल्या स्पर्धेतून कोंबड्यांची सुटका करण्यात आली. स्पर्धेच्या आयोजकाने सुरुवातीला विरोध केला. मात्र, पोलिसांनी त्यांची ओळख उघड केल्यावर त्यांचा विरोध मावळला. याप्रकरणी चार जणांविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कोंबड्यांना जप्त करून सिमुलिया पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले.

यानंतर पोलिसांना कोंबड्यांना त्यांच्या आरोग्याच्या तपासणीसाठी सिमुलिया पशुवैद्यकीय रुग्णालयात घेऊन जावे लागले. सिमुलिया पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक जयंत बेहरा यांनी सांगितले की, पक्ष्यांची प्रकृती सामान्य असल्याचे लक्षात येताच पक्षी त्यांच्या मालकांच्या स्वाधीन करण्यात आले, त्यांनी भविष्यात अशा स्पर्धांमध्ये भाग घेणार नसल्याचे लेखी हमीपत्र दिले. पक्ष्यांचे खाद्य आणि आरोग्य सेवेवर पोलिसांनी 5,000 रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली.

Back to top button