कमलम मध्ये आहे पोषक घटकांचे भांडार | पुढारी

कमलम मध्ये आहे पोषक घटकांचे भांडार

नवी दिल्‍ली : ‘कॅक्टस’ कुळातील झाडांकडे एरवी फळाबाबत पाहिले जात नाही. मात्र, कॅक्टसशी संबंधितच असलेल्या ‘कमलम’ म्हणजेच ‘ड्रॅगन फ्रूट’ची लोकप्रियता जगभर वाढली आहे. भारतातही कमलम ची शेती मोठ्या प्रमाणात होत आहे. या फळात लाल व पांढर्‍या गाभ्याचे असे दोन प्रकार असतात. ही दोन्ही प्रकारची फळे पोषक घटकांचे भांडार असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आयसीएआर) आणि बंगळूरच्या भारतीय बागबानी अनुसंस्थान संस्थानच्या संशोधकांनी भारतात उत्पादित केल्या जाणार्‍या कमलमच्या सात लोकप्रिय क्लोन्सची तपासणी केली आहे. त्यामध्ये दोन सफेद गाभ्याच्या आणि पाच लाल गाभ्याच्या कमलमचा समावेश आहे. तुलनेने सफेद गाभ्याच्या कमलमपेक्षा लाल गाभ्याच्या कमलममध्ये फायबर, फेनोलिक्स आणि अँटिऑक्सिडंटस् अधिक असतात असे दिसून आले आहे.

तसेच, सफेद गाभ्याच्या कमलममध्ये अधिक उत्पादन क्षमता आणि शर्करा अधिक असते. एकंदरीतच या फळात अमिनो अ‍ॅसीड, हिस्टिडीन, लायसिन, मेथियोनीन आणि फेनिलएलनिनसारखे घटक असतात. कॅुफक अ‍ॅसीड, फेरुलिक अ‍ॅसीड, ‘क’ जीवनसत्व, पोटॅशियम आणि लोहही असते.

दोन्ही प्रकारची फळे आरोग्यासाठी अत्यंत पोषक असतात. त्यांच्यामध्ये कॅलरीचे प्रमाणही कमी असते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. कमलमच्या रोपांना बारा ते पंधरा महिन्यांनंतर फुले येणे सुरू होते. फळ लागल्यानंतर 30-35 दिवसांनी ती तोडण्यासाठी तयार होतात.

Back to top button