दक्षिण कोरियात मेंदू खाणार्‍या अमिबाची दहशत

दक्षिण कोरियात मेंदू खाणार्‍या अमिबाची दहशत

सेऊल : जगभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा थैमान घालत असतानाच आता आणखी एका संकटाची चाहूल लागली आहे. 'नेग्लेरिया फॉलेरी' नावाच्या या एका नव्या संसर्गामुळे विशेषतः दक्षिण कोरियात चिंता वाढली आहे. दक्षिण कोरियातील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मेंदू खाणार्‍या अमिबामुळे हा संसर्ग निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाने थायलंडहून आलेल्या व्यक्तीचा मृत्यू 'नेग्लेरिया फॉलेरी' संसर्गाने झाल्याचे म्हणत यावर शिक्कामोर्तब केले आहे. या संसर्गामध्ये मानवी मेंदू नष्ट होतो.

10 डिसेंबरला ही 50 वर्षीय व्यक्ती कोरियामध्ये परतली. जवळपास चार महिने साऊथ ईस्ट एशियन देश, थायलंडमध्ये वास्तव्य करून परतलेल्या या व्यक्तीला कोरियात येताच दुसर्‍या दिवशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तयानंतर काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. स्थानिक वृत्तसंस्थांनी यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले. पहिल्यांदाच या संसर्गाची माहिती अमेरिकेत 1937 मध्ये झाली होती. 'नेग्लेरिया फॉलेरी' हा एक प्रकारचा अमिबा आहे.

गोड्या पाण्याची तळी, नद्या, कालवे आणि तलावांत तो आढळतो. नाकावाटे तो शरीरात प्रवेश करतो आणि तिथून मेंदूपर्यंत पोहोचत तेथील पेशींना उद्ध्वस्त करण्यास सुरुवात करतो. सध्याच्या घडीला या संसर्गाची प्रकरणे पूर्णपणे अनपेक्षित आहेत. असे असले तरीही दक्षिण कोरियामध्ये सतर्कता म्हणून नागरिकांना जलस्रोतांमध्ये न पोहण्याचा सल्ला दिला आहे. संपूर्ण जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने दहशत माजवली आहे.

चीनमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे आरोग्य यंत्रणांवरही कमालीचा ताण आला आहे. त्यातच दक्षिण कोरियामध्ये 'नेग्लेरिया फॉलेरी'चा रुग्ण आढळल्यामुळे चिंता वाढली आहे. सध्याच्या घडीला या संसर्गाचे आणखी रुग्ण समोर आले नसले तरीही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news