मुलाने गिळल्या तब्बल 52 गोट्या! | पुढारी

मुलाने गिळल्या तब्बल 52 गोट्या!

लंडन : लहान मुलं कधी कोणता उपद्व्याप करतील हे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवावेच लागते. अनेक मुलांनाही काहीही तोंडात टाकण्याची आणि गिळण्याची सवय असते. आता इंग्लंडमधील पाच वर्षांच्या ज्यूड फोली नावाच्या बालकाने एक-दोन नव्हे, तर तब्बल 52 गोट्या गिळल्याची घटना घडली आहे. या मुलाने 52 मॅग्नेटिक मार्बल्स गिळल्या होत्या.

वेल्समधील टायडफिल येथे राहणार्‍या ज्यूड फॉलीला पोटात दुखू लागल्याने त्याचे पालक त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले. सुरुवातीला डॉक्टरांना हा किरकोळ प्रकार वाटला आणि त्यांनी नेहमीची औषधं दिली. परंतु, पोटदुखीचा त्रास वाढल्याने त्याची आई लिंडसे त्याला टायडफिल येथील प्रिन्स चार्ल्स रुग्णालयात घेऊन गेली. ज्यूडची रक्त तपासणी करण्यात आली असता त्याचे रिपोर्ट नॉर्मल आले. मात्र, त्याच्या पोटाच्या भागाचा एक्स-रे काढल्याने सर्वांनाच धक्का बसला.

सुरुवातीला, डॉक्टरांना वाटले की त्याच्या पोटात एक ब्रेसलेट आहे, परंतु नंतर त्यांना समजले की त्या लहान गोट्या आहेत, त्यापैकी 52 गोट्या एकमेकांना चिकटून असल्याने ब्रेसलेटसारखा आकार तयार झाला होता.ज्यूडला कार्डिफमधील नोहाज आर्क चिल्ड्रन हॉस्पिटल ऑफ वेल्समध्ये नेण्यात आले. तिथे त्याच्या पोटातून सर्व 52 गोट्या सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी एक मोठे ऑपरेशन करण्यात आले. त्याच्या अपेंडिक्समध्येही एक मार्बल अडकला होता. परिणामी, डॉक्टरांनी चिमुकल्याचे अपेंडिक्स काढण्याचा कठीण निर्णय घेतला, कारण त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता.

चुंबकीय गोट्या अशाप्रकारे अडकल्या होत्या, की त्यामुळे डॉक्टरांना मुलाच्या पोटात पाच वेगवेगळ्या ठिकाणी कट करावे लागले. संपूर्ण प्रक्रियेला सात तास लागले आणि प्रत्येक मिनिट आपल्यासाठी आव्हानात्मक होता, असे ज्यूडच्या आईने सांगितले. पालकांनाही त्यांच्या मुलांची खेळणी निवडताना अधिक काळजी घेण्याचा सल्ला तिने दिला.

Back to top button