पन्नास वर्षे जंगलात राहणारा माणूस | पुढारी

पन्नास वर्षे जंगलात राहणारा माणूस

रोम : स्वेच्छेने स्वीकारलेला एकांतवास वेगळा आणि लादलेला एकाकीपणा वेगळा. असा एकाकीपणा भयाण असतो व त्याचे मनावर तसेच शरीरावरही विपरित परिणाम होत असतात. मात्र, काही लोक स्वेच्छेने एकांतवास पत्करतात. फाब्रिझाओ कार्डिनाली…वय वर्ष 72…जिथं लोक आधुनिकीकरणाच्या नावावर उंची राहणीमान जगणे पसंत करतात तिथे कार्डिनालीसारखी व्यक्ती मात्र गेल्या 50 वर्षांपासून एका जंगलात एकाकी वास्तव्य करतेय. जिथे ना वीज आणि ना गॅस…घरात साधी पाण्याची पाईपलाईन देखील नाही. वाढत्या महागाईने सारेच जण त्रासलेत; पण कार्डिनालींना त्याची जराही चिंता नाही.

इटलीच्या पूर्व ऍड्रियाटिक किनारपट्टीवरील अँकोनाजवळील व्हर्डिचियो वाईन कंट्रीच्या टेकड्यांमध्ये त्याचे दगडी फार्महाऊस आहे. पहाटे उठायचं…शेतात काम करायचं…फार्म हाऊसमध्ये पिकवलेला भाजीपाला, अन्नधान्य हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन…अगदी घाण्यावर तेल काढण्यापासून मध मिळवण्यापर्यंत सगळी कामे कार्डिनाली स्वत: करतात…आपण जगापासून इतक्या दूरवर आलो आहोत की, लोकांच्या गर्दीत पुन्हा जाण्याची इच्छाच होत नाही, असे कार्डिनाली यांचे म्हणणे आहे.

फाब्रिझाओ कार्डिनाली यांनी सांगितले की, मला आता जगाचा भाग होण्यात रस नाही म्हणूनच मी सारे काही सोडले. कुटुंब, माझे विद्यापीठ, माझे मित्र, माझा संघ हे सगळं मी केव्हाच मागे सोडलंय. काहीतरी त्याग करणे म्हणजे खूप काही केले असे होत नाही. तर काहीतरी मिळवायचे असते म्हणून तुम्ही त्याग करता. सध्या माझ्याकडे एक कोंबडा, तीन कोंबड्या आणि एक मांजर हेच माझे सोबती आहेत. 35 वर्षांचा अग्नीस आणि 46 वर्षांची अँड्रिया कार्डिनाली यांच्या भेटीसाठी इथे नियमितपणे येतात.

कार्डिनाली अधूनमधून मित्रांना भेटण्यासाठी कमी अंतराचा प्रवास करतात. स्थानिकांसोबत कॉफी पिण्यासाठी किंवा डॉक्टरांना भेटण्यासाठी जवळच्या गावात जातात. मात्र, त्यांचा बहुतांश वेळ एकाकी जगण्यातच जातो. अर्थात याचा त्यांना अजिबात पश्चाताप नाही. त्यांची जीवनशैली पाहण्यासाठी येणार्‍या लोकांना ते एकच सल्ला देतात. चांगलं जगायचं असेल तर सगळ्यात आधी तुमच्या हातातला स्मार्ट आधी फोन फेकून द्या.

Back to top button