Air hostess : सर्वाधिक वयाची हवाई सुंदरी! | पुढारी

Air hostess : सर्वाधिक वयाची हवाई सुंदरी!

न्यूयॉर्क : फ्लाईट अटेंडंटचे काम सोपे नसते. एव्हिएशन इंडस्ट्रीमधील हे एक आव्हानात्मक असेच काम आहे. फ्लाईट अटेंडंटला आपण बोलीभाषेत ‘एअर होस्टेस’ किंवा ‘हवाई सुंदरी’ (Air hostess) असे म्हणत असतो. आपल्या सुहास्यवदनामागे त्यांनी अनेक प्रकारची आव्हाने, कष्ट, धावपळीचे जीवन खुबीने लपवलेले असते. भारतीय फ्लाईट अटेंडंट नीरजा भनोत यांनी तर दहशतवाद्यांनी ‘पॅन एम एअरलाईन्स’च्या विमानाचे अपहरण केले असताना प्रवाशांसाठी आपल्या प्राणाचेही बलिदान केले होते. असे खडतर व्यावसायिक जीवन बेट्टे नॅश नावाची महिला अनेक दशकांपासून जगत आली आहे. यावर्षी नॅश 86 वर्षांच्या झाल्या असून त्या जगातील सर्वाधिक वयाच्या फ्लाईट अटेंडंट ठरल्या आहेत.

बेट्टे यांची आकाशातील सफर 1957 मध्ये सुरू झाली होती व ती अद्यापही सुरूच आहे. त्यांनी ज्यावेळी नोकरी सुरू केली त्यावेळी फ्लाईटचे भाडे 12 डॉलर्स म्हणजेच सुमारे 990 रुपये होते. यावर्षी नॅश 86 वर्षांच्या झाल्या असून त्यांच्या नावाची नोंद ‘दीर्घकाळ फ्लाईट अटेंडंट’ची सेवा देण्यासाठी गिनिज बुकमध्येही झाली आहे. त्या जगातील सर्वाधिक वयाच्या एअर होस्टेस (Air hostess) आहेत. नोव्हेंबरमध्ये अमेरिकन एअरलाईन्ससमवेत काम करीत त्यांनी नोकरीची 65 वर्षे पूर्ण केली. एअर होस्टेस बनण्याची इच्छा त्यांच्या मनात वयाच्या सोळाव्या वर्षी निर्माण झाली होती. ही गोष्ट 1952 मधील आहे. अर्लिंग्टनमध्ये रीगन नॅशनल एअरपोर्टपासून ओहियोपर्यंत त्यांनी प्रवास केला. त्यावेळी विमानातील फ्लाईट अटेंडंटचे शालीन वागणे व त्यांचा पोशाखही त्यांच्या मनात घर करून राहिला. त्याचवेळी त्यांनी आपणही फ्लाईट अटेंडंट बनावे असे ठरवले. त्यांची ही इच्छा वयाच्या 21 व्या वर्षी पूर्ण झाली. त्यावेळी आयसेनहॉवर हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यावेळी अमेरिकन एव्हिएशन इंडस्ट्रीचा सुवर्णकाळ सुरू होता. त्यावेळी तिकीट हाताने लिहिले जात असे. रिझर्व्हेशनची गरज नसायची. अशा काळापासून आजपर्यंत त्यांनी फ्लाईट अटेंडंटचा प्रवास केला आहे. 1961 पासून त्या न्यूयॉर्क-वॉशिंग्टन-बोस्टन रुटवरच काम करीत आहेत. आपले काम करून त्या रोज मॅसाच्युसेटस्मधील आपल्या घरी जातात जिथे त्यांचा दिव्यांग मुलगा त्यांची वाट पाहत असतो!

हेही वाचा : 

Back to top button