सस्तन प्राण्याला भक्ष्य बनवणारा डायनासोर | पुढारी

सस्तन प्राण्याला भक्ष्य बनवणारा डायनासोर

बीजिंग : डायनासोरमध्येही अनेक प्रजाती होत्या आणि त्यांच्यामधील वैविध्य हे थक्क करणारेच आहे. आता कावळ्याच्या आकाराच्या एका डायनासोरचे जीवाश्म सापडले आहे. या डायनासोरने आपल्या शेवटच्या जेवणात एका सस्तन प्राण्याला भक्ष्य बनवले होते याचे पुरावे आढळले आहेत. 12 कोटी वर्षांपूर्वीचा हा कावळ्यासारखा डायनासोर आहे.

‘मायक्रोरॅप्टर’ हा पक्ष्यासारखा असणारा मांसाहारी डायनासोर होता. त्याला चार पंख होते. चीनमध्ये या डायनासोरचे सुरक्षितपणे जतन झालेले जीवाश्म आहे. या प्रजातीचे वैज्ञानिक नाव ‘मायक्रोरॅप्टर झाओईनस’ असे आहे. त्याच्या शरीरात 1 सेंटीमीटर लांबीच्या पायाचा तुकडा आहे. हा पाय उंदीर, घुशीसारख्या कृदन्त वर्गातील म्हणजेच रॉडन्टचा असावा. एखाद्या छोट्या आकाराच्या सस्तन प्राण्याला हे छोटे थेरोपॉडस् भक्ष्य बनवत होते याचा हा प्रत्यक्ष पुरावा आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘जर्नल ऑफ व्हर्टेब—ेट पॅलियोंटोलॉजी’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. मॅकगिल युनिव्हर्सिटीतील पॅलियोंटोलॉजिस्ट हॅन्स लॅरसन यांनी सांगितले की आधी माझा यावर विश्वासच बसला नाही. मात्र, हे एक वास्तव होते. हे डायनासोर सस्तन प्राण्यांना भक्ष्य बनवत होते याचा हा ठोस पुरावा आहे. हे एक दुर्मीळ उदाहरण आहे.

Back to top button