भारतीय संशोधकांनी बनवला पारदर्शक सिरॅमिक | पुढारी

भारतीय संशोधकांनी बनवला पारदर्शक सिरॅमिक

नवी दिल्‍ली : भारतीय संशोधकांनी एक पारदर्शक सिरॅमिक विकसित केला आहे. थर्मल इमेजिंग, हेल्मेट, फेसशिल्ड आणि गॉगल्ससारख्या व्यक्‍तिगत सुरक्षा उपकरणांमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. ‘कोलायडल प्रोसेसिंग’ नावाच्या तंत्राने हे सिरॅमिक विकसित केले गेले. भारतात प्रथमच भारतीय संशोधकांनी अशा पद्धतीचे तंत्र विकसित करण्यात आले आहे.

पारदर्शक सिरॅमिक हे एक अत्याधुनिक सामग्री आहे. त्यामध्ये अतिशय स्पष्ट अशी पारदर्शिता आणि उत्कृष्ट ‘मेकॅनिकल’ गुण आहेत. वैश्‍विक स्तरावर अनेक देश पारदर्शक सिरॅमिक बनवतात, मात्र त्यांना अनेक मर्यादा आहेत. भारतात पारदर्शक सिरॅमिक बनवण्यासाठी बर्‍याच काळापासून प्रयत्न सुरू होते.

मात्र, एक तर त्यांची पारदर्शिता कमी होती किंवा ते प्रयोगशाळेपुरतेच मर्यादित राहिले. या पारदर्शक सिरॅमिक सॅम्पलची निर्मिती क्रिटिकली इंजिनिअर्ड प्रोसेसिंग पद्धतीने उच्च शुद्धता असलेल्या पावडरीच्या सहाय्याने केली आहे. अशुद्ध घटक बाहेर काढणे हे यासाठी महत्त्वाचे ठरते.

त्यासाठी उच्च तापमान असलेली एक प्रक्रिया वापरली जाते. गुरुग्राममधील इंटरनॅशनल अ‍ॅडव्हान्स रिसर्च सेंटर फॉर पावडर मेटालर्जी अँड न्यू मटेरियल्स (एआरसीआय) च्या संशोधकांनी हे पारदर्शक सिरॅमिक विकसित केले आहे. त्याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘मटेरियल्स केमिस्ट्री अँड फिजिक्स’ या नियतकालिकात देण्यात आली आहे.

Back to top button