हिवाळ्यात ऊन घेतल्याने कमी होते नैराश्य | पुढारी

हिवाळ्यात ऊन घेतल्याने कमी होते नैराश्य

नवी दिल्ली : कोवळे ऊन हे ‘ड’ जीवनसत्त्वनिर्मितीसाठी लाभदायक असते. उन्हाळ्यात लोकांचा कल सहसा ऊन टाळण्याकडेच असतो. मात्र, हिवाळ्यात ऊन हवेहवेसे वाटते. या ऋतूत ऊन घेतल्याने लाभही मोठाच होत असतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. रोज दहा मिनिटे जरी उन्हात बसले, तरी शरीराला पुरेशा प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्व मिळत असते. त्यामुळे नैराश्यासारख्या समस्या कमी होण्यासही मदत होते.

हिवाळ्यात आठवड्यातून चार दिवस ऊन घेणे लाभदायक ठरते. उन्हात बसल्याने शरीराला ‘ड’ जीवनसत्त्व मिळते व त्याचा मेंदूला लाभ मिळतो. ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेने मेंदूचा विकास चांगल्याप्रकारे होत नाही. जर तरुणांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असेल, तर ते डिप्रेशनमध्ये जाण्याचा धोका अधिक असतो. मात्र, आठवड्यातून किमान चार दिवस उन्हात बसल्याने हा धोका कमी होतो.

हिवाळ्यात ऊन घेतल्याने मेंदूच्या पेशी सक्रिय राहतात आणि त्यामुळे मेंदूचे कार्य सुरळीत होत राहते. त्यामुळे विचारक्षमतेतही वाढ होते. उन्हात बसल्याने शरीरातून मेलाटोनिन हार्मोन उत्सर्जित होते आणि रात्री झोपही शांत व गाढ लागते. सूर्यकिरणे सेरोटोनिन शोषून घेतात व आपला मूड आनंदी ठेवण्यासाठी मदत करतात.

Back to top button