चक्क समुद्रतळाशी वाजवला पियानो! | पुढारी

चक्क समुद्रतळाशी वाजवला पियानो!

लंडन : इंग्लंडच्या ब्रिस्टॉलमधील यूट्यूब स्टार जो जेनकिन्स नेहमी अनेक ठिकाणी पियानो वाजवतो; पण यावेळी त्याने वाजवलेला पियानो सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारा आहे. कारण, जेनकिन्सने यावेळी चक्क समुद्राच्या पाण्यात जाऊन पियानो वाजवला. त्याचा हा जबरदस्त टॅलेंट कॅमेरात कैद झाला असून, व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे.

जेनकिन्सने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘मी पियानो वाजवला, समुद्राच्या पाण्यात, समुद्राच्या पाण्यात,’ असे कॅप्शन त्याने शेअर केलेल्या व्हिडीओला दिले आहे. संपूर्ण शरीराला कव्हर करेल अशा डायव्हिंग गिअर कॉश्च्यूमसह ऑक्सिजन सिलिंडर लावून जेनकिन्सने समुद्रात उडी घेतली. त्यानंतर त्याने पियानोवर द लिटल मरमेड कार्टूनची धून वाजवली. त्याने सांगितले, मी समुद्राच्या पाण्यात डुबकी मारून पियानो वाजवला.

अखेर मी हे करून दाखवलं. समुद्राच्या पाण्यात पियानो वाजवणारा मी पहिली व्यक्ती आहे, असा दावा त्याने केला आहे. भन्नाट टॅलेंट असलेल्या काही जणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि अनेकांच्या भुवया उंचावतात. दिवसेंदिवस व्हायरल होणारे व्हिडीओ थक्क करून जातात; पण हा व्हिडीओ त्यामध्ये खासच ठरत आहे.

Back to top button