आता पाणी प्या अन् बाटलीही खा! | पुढारी

आता पाणी प्या अन् बाटलीही खा!

वॉशिंग्टन : जगभरात आणि आपल्या देशातही खाता येण्यासारखे कप, बशा, ताट, वाट्या बनवण्यात आलेल्या आहेत. अशाप्रकारची साधने ही पर्यावरणपूरक असतात तसेच लोकांची भूक भागवून पौष्टिक घटकही शरीराला मिळत असतात. मात्र, सध्या जगभरात पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांनी पर्यावरणाला धोकादायक कचरा निर्माण करून ठेवला आहे. आता त्यावर अवघ्या बारा वर्षांच्या एका मुलीने पर्यावरणपूरक तोडगा शोधला आहे. कॅलिफोर्नियातील मेडिसन चेकेटस्ने अशी पाण्याची बाटली बनवली आहे, जी खाता येऊ शकते.

मॅडिसन दरवर्षी सुट्टीसाठी एस्कॉन्डिडो बीचवर जात असे. तेथे शेकडो प्लास्टिकच्या बाटल्यांचा कचरा पाहून तिला वाईट वाटले. यावर या विद्यार्थिनीने प्लास्टिक प्रदूषणावर संशोधन करून ‘इको-हीरो’ प्रकल्पावर काम सुरू केले. मॅडिसनने जिलेटिनचा वापर करून ही खाण्यायोग्य बाटली तयार केली.

चेकेटस्च्या प्रकल्पाने यूटामधील प्रतिष्ठित स्टेम फील्ड स्पर्धा 2022 ब्रॉडकॉम मास्टर्स स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. आता ती हा प्रकल्प राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेत सादर करणार आहे. सुरुवातीच्या संशोधनात चेकेटस्ला कळले की, पाण्याच्या बाटल्या एकाच वापरासाठी डिझाईन केल्या आहेत. त्या वापरल्यानंतर फेकल्या जातात. त्यामुळे त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण पसरते. एका अंदाजानुसार, अमेरिकत दरवर्षी सुमारे 300 दशलक्ष पाण्याच्या बाटल्या वापरल्या जातात.

त्यापैकी बहुतेकांचे पुनर्वापर शक्य होत नाही. अनेकदा बाटल्यांचा हा कचरा प्लास्टिकच्या तुकड्यांच्या स्वरूपात नदी किंवा समुद्रात पोहोचतो आणि पाणी प्रदूषित करतो. संशोधनादरम्यान, चेकेटस्ने जेलपासून बनवलेल्या झिल्लीमध्ये द्रव साठवण्याची प्रक्रिया शोधून काढली. या गुणवत्तेचा वापर तिने आपल्या नवोपक्रमात केला. जिलेटिनच्या पडद्यापासून बनवलेली ही बाटली एक कपपेक्षा थोडे कमी पाणी साठवता येऊ शकते. ती तयार करण्यासाठी सुमारे 100 रुपये खर्च येतो.

Back to top button